सलग तीन व्यवहारातील तेजीमुळे भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक बुधवारी महत्वाच्या टप्प्यांपुढे गेले. एकाच व्यवहारातील प्रत्येकी २ टक्के निर्देशांक वाढीमुळे सेन्सेक्सला ५१ हजाराचा, तर निफ्टीला १५ हजाराचा टप्पा पुन्हा गाठता आला.

मुंबई निर्देशांक बुधवारी १,१४७.७६ अंश वाढीमुळे ५१,५०० नजीक, ५१,४४४.६५ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ३२६.५० अंश वाढीने १५,२५० पर्यंत, १५,२४५.६० वर स्थिरावला. निर्देशांकांनी महिन्यातील सर्वोत्तम सत्रझेप नोंदली गेली.

गेल्या सलग तीन व्यवहारातील लक्षणीय निर्देशांक वाढीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती या दरम्यान ९.४१ लाख कोटी रुपयांनी वाढली. सर्वात जुन्या बाजाराचे भांडवल बुधवारी ३.६९ लाख कोटींनी वाढून सत्रअखेर २१०.२२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

१ मार्चपासून सेन्सेक्समध्ये २,३४४.६६ तर निफ्टीत ७१६.४५ अंश भर पडली आहे. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे ४.७७ व ४.९३ आहे.

बुधवारीही गुंतवणूकदारांनी बँक, वित्त क्षेत्रासाठी समभाग खरेदी मागणी नोंदवली. सेन्सेक्समध्ये २७ कंपनी समभागांचे मूल्य वाढले. तर सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले.