भांडवली बाजारातील खरेदी उत्साह सलग चौथ्या व्यवहार सत्रात कायम राहिल्याने मंगळवारी ‘सेन्सेक्स’ने आणखी ६०० अंशांची कमाई केली. करोनाची लागण झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रुग्णालयातून सुखरूप परतल्याचे जगभरातील बाजारातील आनंदाचे प्रतिबिंब स्थानिक बाजारातही उमटले.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेविषयक शुभसंकेत देणारी आकडेवारी आणि दुसऱ्या तिमाहीच्या वित्तीय निकालांचा हंगाम तुलनेने चांगला असण्याच्या आशेने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकतेस कारणीभूत ठरले. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ६००.८७ अंशांची भर घालून (१.५४ टक्के) ३९,५७४.५७ वर दिवसअखेर स्थिरावला. बरोबरीने निफ्टी निर्देशांकही १५९.०५ अंशांच्या मुसंडीसह मंगळवारचे व्यवहार थंडावले तेव्हा ११,६६२.४० या पातळीवर विसावलेला दिसून आला.

उपचारांना उत्तम प्रतिसाद देणाऱ्या ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत चांगल्या बातमीने हर्षभरीत वॉलस्ट्रीटचे अनुकरण करीत आशियाई बाजारातही मंगळवारी तेजीचे वारे फिरताना दिसून आले. अमेरिकेत अर्थप्रोत्साहक पॅकेजसंबंधी आशावादाने बाजाराच्या सकारात्मक भावनांना आणखीच चालना मिळाली. भारतात सेवा क्षेत्राच्या ‘पीएमआय निर्देशांका’त सप्टेंबरमध्ये सलग पाचव्या वाढीचा दाखविलेला कल, तसेच सरकारकडून तीन त्रयस्थ सदस्यांच्या नेमणुकीनंतर, रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची बुधवारपासून सुरू होऊ घातलेल्या बैठकीसारख्या अनुकूल घडामोडींनी गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावणारी कामगिरी केली.

निम्मे योगदान ‘एचडीएफसी’चे!

निर्देशांकांमध्ये वजनदार स्थान असणाऱ्या एचडीएफसी लिमिटेडच्या समभागाने मारलेली ८.३५ टक्क्यांची उडी मंगळवारच्या व्यवहाराचे वैशिष्टय़ ठरले. सप्टेंबरमध्ये गृहकर्जाचे वितरण हे जवळपास गेल्या वर्षांइतक्याच (सुमारे ९५ टक्के) पातळी गाठणारे झाले आहे, असे  एचडीएफसीने जाहीर केले आहे. टाळेबंदीच्या काळातील संपूर्ण मरगळ झटकून, दमदार उभारीच्या या प्रत्ययाचे बाजारात स्वागत एचडीएफसीसह बँका व वित्तीय सेवा कंपन्यांच्या समभागांना मागणीतून केले गेले. सेन्सेक्सच्या सहा शतकी मुसंडीमध्ये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक या दोहोंचे मिळून जवळपास निम्मे योगदान राहिले.