सलग दुसऱ्या सत्रात वाढ नोंदवीत सेन्सेक्स २१ हजारांपुढे राहताना विक्रमी स्तराच्या अगदी वेशीवर येऊन पोहोचला आहे. ६७.१३ अंश वाढीने मुंबई निर्देशांक २१,२७६.८६ पर्यंत गेला. तर निफ्टी ३०.७० अंश वाढीमुळे ६,३०० चा टप्पा ओलांडत ६,३२८.६५ पर्यंत झेपावला आहे.
सेन्सेक्सने यापूर्वी २३ जानेवारी रोजी २०,३७३.६६ ही सर्वोच्च पातळी गाठली आहे.
प्रमुख भांडवली बाजार मंगळवारी युक्रेन-रशियातील तणाव निवळत असल्याच्या चिन्हाच्या जोरावर अडीचशेहून अधिक अंशांनी झेपावत २१ हजारांवर गेला होता. (याच दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १८५.६१ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.) सलगच्या सत्रात त्याला सकाळीच जाहीर झालेल्या १६ व्या लोकसभेच्या निवडणूक वेळापत्रकाची जोड मिळाली. दिवसअखेर त्यात किरकोळ अंशवाढ झाली असली तरी सेन्सेक्स सहा आठवडय़ांच्या नव्या उच्चांकावर स्वार झाला आहे.
स्थानिक शेअर बाजारातील निर्देशांकांना जागतिक शेअर बाजारातील तेजीचीही साथ लाभली. सिंगापूर, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथे निर्देशांक वाढ होती. सकाळच्या व्यवहारात १२३ अंशांची वाढ राखतानाच सेन्सेक्स २१,३३३.२० पर्यंत गेला होता. दिवसअखेर बँक समभागांनी निर्देशांकात तेजीचे इंधन कायम राखले. भांडवली वस्तूंचेही त्याला साहाय्य राहिले.
सेन्सेक्समधील वधारलेल्या १७ समभागांमध्ये आयसीआयसीआय बँक (२.७%), ओएनजीसी, इन्फोसिस, आयटीसी, एचडीएफसी यांचे समभाग मूल्य उंचावले. तर घसरलेल्या १३ समभागांमध्ये टाटा पॉवर ३.२५ टक्क्यांसह आघाडीवर राहिला.
रुपयातही दुसरी तेजी
चालू आठवडय़ात सलग दुसऱ्या व्यवहारात भारतीय चलनही भक्कम झाले. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १० पैशांनी उंचावत ६१.७५ पर्यंत पोहोचला. आठवडय़ाच्या सुरुवातीच्या २९ पैशांचे नुकसान सोसणारा रुपया बुधवारी १९ पैशांनी वधारला होता.