करोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती आव्हानात्मक असली तरी रिझर्व्ह बँकेच्या ‘थांबा व वाट पाहा’ या अपेक्षित धोरणाचे भांडवली बाजारात बुधवारी ‘सेन्सेक्स’मध्ये दिसलेल्या ४६० अंशांच्या मुसंडीतून स्वागत करण्यात आले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात झालेल्या १०५ पैशांच्या पडझडीलाही बाजाराने दुर्लक्षित केले.

व्याजदरातील बदलाबाबत संवेदनशील बँका, वाहन  कंपन्यांना बुधवारच्या बाजारातील तेजीचा सर्वाधिक लाभ मिळताना दिसून आला. स्टेट बँक सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढलेला समभाग ठरला.

स्टेट बँकेसह, आयसीआयसीआय, इंडसइंड बँक, नेस्ले, मारुती, बजाज ऑटो आणि महिंद्र अँड महिंद्र हे बुधवारच्या व्यवहारात सर्वाधिक वाढ नोंदविणारे समभाग ठरले. त्याउलट टायटन, एनटीपीसी आणि हिंदुस्तान युनिलिव्हर हे घसरणीतील समभाग राहिले. रेपो दर आहे त्या पातळीवर स्थिर राखताना, रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला सध्या संकटकाळातून तरून जाण्यासाठी उपयुक्त १ लाख कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदीची जाहीर केलेली योजना बाजाराच्या पसंतीस उतरली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.