सेन्सेक्स, निफ्टीत अर्धा टक्का भर; रुपयाही सावरला

मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक तसेच स्थानिक चलन मंगळवारच्या मुसळधार आपटीतून अखेर आठवडय़ाच्या तिसऱ्या व्यवहारात सावरले. गेल्या ११ महिन्यातील सुमार आपटी नोंदविणारे सेन्सेक्स व निफ्टी बुधवारी जवळपास अर्ध्या टक्क्य़ाने वाढले.

बँकांबरोबरच पोलाद क्षेत्रातील समभागांनी गुंतवणूकदारांनी साथ दिल्याने मुबंई निर्देशांक बुधवारी १६१.८३ अंश वाढीने ३६,७२४.७४ वर पोहोचला. तर ४६.७५ अंश भर नोंदवित त राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १०,८४४.६५ पर्यंत स्थिरावला.

मंगळवारच्या तब्बल ७७० अंश आपटीनंतर मुंबई शेअर बाजाराचे बुधवारचे व्यवहार तेजीसहच सुरू झाले. व्यवहारात सेन्सेक्स आधीच्या सत्राच्या तुलनेत थेट ३६७ अंशांपुढील वाटचाल करता झाला. तर दिवसअखेरही तेजी कायम राहिल्याने निर्देशांक वाढला.

व्यवहारात ३६,७२४.७४ पर्यंत झेप घेणाऱ्या मुंबई निर्देशांकाने सत्रात ३६,४०९.५४ चा सत्रतळही अनुभवला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाच्या बुधवारच्या सत्राचा प्रवास १०,७४६.३५ ते १०,८५८.७५ असा वरचा राहिला.

सेन्सेक्समधील एकूण ३० पैकी १८ समभागांचे मूल्य वाढले. तर १२ कंपनी समभाग मूल्य घसरणीच्या यादीत राहिले. भारती एअरटेल, स्टेट बँक, टाटा स्टील, वेदांता, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, ओएनजीसी आदींचे मूल्य जवळपास ३ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

मारुती सुझुकी, सन फार्मा, टाटा मोटर्स, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, महिंद्र अँड महिंद्र, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज आदींचे मूल्य याच प्रमाणात मात्र घसरते राहिले. वाहन कंपन्यांच्या समभागांचा विक्री दबाव अधिक राहिला.

रुपया नऊमाही तळातून बाहेर

भांडवली बाजाराबरोबरच येथील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही बुधवारी वाढले. एकाच व्यवहारात २७ पैशांची भर नोंदविताना स्थानिक चलन ७२.१२ रुपयांवर स्थिरावले. परिणामी मंगळवारी गेल्या नऊ महिन्यांच्या तळातून डोके वर काढण्यास रुपयाला आठवडय़ाच्या तिसऱ्या सत्रात उसंत मिळाली. रुपया मंगळवारी ७२.३९ या त्याच्या गेल्या नऊ महिन्यांच्या खोलात रुतला होता. रुपयाचा बुधवारचा प्रवास सुरुवातीपासूनच तेजीत होता. ७२.२० वर सुरुवात करताना चलन व्यवहारात ७१.९६ पर्यंत झेपावले.

मौल्यवान धातूंमध्ये दरचमक

भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी उंचावला असतानाच मुंबईच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूच्या दरातील तेजीही अनुभवली गेली. तुलनेत सोन्यापेक्षा चांदीच्या किंमती अधिक प्रमाणात उंचावल्या. स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्यासाठीचा भाव ६० रुपयांनी वाढून ३९ हजार रुपयांपुढे जाताना ३९,०३० रुपयापर्यंत पोहोचला. तर चांदीचा दर एकाच व्यवहारात थेट १,८९५ रुपयांनी झेपावत जवळपास ५० हजारापर्यंत ठेपला. पांढरा धातू ४९,९५० रुपयांवर स्थिरावला.