टाटा सन्सचे अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची गच्छंची केल्याचे अपेक्षित पडसाद मंगळवारी शेअर बाजारात पाहायला मिळाले. आज बाजार उघडल्यानंतर टाटा समुहातील प्रमुख कंपन्यांचे समभाग तीन ते पाच टक्क्यांनी कोसळले. सायरस मिस्त्रींना अध्यक्षपदावरून हटवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून येत असून सेन्सेकमध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. सध्या सेन्सेक्स १४७ अंशांच्या घसरणीसह २८०३१.६९ पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात ऑटो, एफएमसीजी, आयटी, मेटल व ऑईल अँड गॅस क्षेत्रात नकारात्मक व्यवहार सुरु आहे. याऊलट, बँकिंग, हेल्थकेअर क्षेत्रात मात्र सकारात्मक व्यवहार सुरु आहे. टाटा समुहातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा कम्युनिकेशन्स, टाटा बेव्हरेज या कंपन्यांचे समभाग घसरले आहेत. सर्वाधिक फटका टाटा स्टीलला बसला असून कंपनीच्या समभागांमध्ये ३ टक्क्यांची घसरण झाली असून टाटा मोटर्स आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये प्रत्येकी एक टक्क्याची घसरण झाली आहे. याशिवाय, टाटा स्टील, आयडिया सेल्युलर, टाटा पॉवर, एचडीएफसी बँक आणि आयशर मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.