देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा बँकेचे दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या आदित्य पुरी यांचे उत्तराधिकारी म्हणून शशिधर जगदीशन यांचे नाव मंगळवारी निश्चित झाले. एचडीएफसी बँकेने मुख्याधिकारी पदासाठी सुचविलेल्या तीन उमेदवारांपैकी जगदीशन यांच्या नावावर रिझव्‍‌र्ह बँकेने मंजुरीची मोहोर उमटवली आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात आदित्य पुरी एचडीएफसी बँकेवरून निवृत्त झाल्यावर ५५ वर्षांचे जगदीशन हे बँकेचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. २७ ऑक्टोबरपासून तीन वर्षांचा कार्यकाळ असेल. पुरी यांचे वारसदार म्हणून जगदीशन यांच्या व्यतिरिक्त एचडीएफसीच्या घाऊक बँकिंग विभागाचे प्रमुख कैजाद भरुचा आणि सिटी बँकचे सुनील गर्ग यांची नावे एचडीएफसी बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेला सुचविली होती. मात्र एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार जगदीशन हेच होते.

एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी आदित्य पुरी सप्टेंबर १९९४ पासून हे पद भूषवीत आहेत. देशातील कोणत्याही बँकेचे प्रदीर्घ काळ नेतृत्व केलेले ते मुख्याधिकारी आहेत. पुरी यांनी मागील महिन्यातील वार्षिक सभेत उत्तराधिकाऱ्यांविषयी सर्व चर्चाना विराम देत, ‘‘माझा उत्तराधिकारी मागील २५ वर्षांपासून बँकेची सोबत करणाराच असेल,’’ असे सूचक विधान केले होते.

कोण आहेत जगदीशन?

जगदीशन डॉइशे बँकेतील नोकरी सोडून १९९६ साली एचडीएफसी बँकेत वित्त विभागात व्यवस्थापक पदावर रुजू झाले. १९९९ मध्ये वित्त विभागाचे प्रमुखपद मिळविण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सनदी लेखापाल असलेल्या जगदीशन यांनी  अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.