सहकार क्षेत्रातील बहुराज्यीय व शेडय़ूल्ड दर्जा असलेल्या ‘द भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.’ने १५०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या बँकांच्या वर्गवारीत सर्वोत्तम कामगिरीचा प्रथम पुरस्कार मिळविला आहे. बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेडकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारात भारत बँकेने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुरस्काराचा स्वीकार करताना भारत बँकेचे अध्यक्ष जया सुवर्णा म्हणाले की, वार्षिक सरासरी २५ टक्के दराने व्यावसायिक प्रगती साधूनही बँकेने थकीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे. चालू वर्षांत रिझव्र्ह बँकेने १५ नवीन शाखा सुरू करण्याची बँकेला परवानगी दिली आहे.
दागिने रचनाकारांसाठी पुरस्काराची घोषणा
मुंबई : देशातील रत्न व आभूषण उद्योगांची शिखर संघटना ‘जीजेईपीसी’ने देशभरातील प्रस्थापित व उदयोन्मुख दागिने रचनाकारांसाठी एका विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे. गेली २५ वर्षे या उद्योगासाठी नियमितपणे पुरस्कार व पारितोषिकांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ‘जीजेईपीसी’ने ‘आर्टिझन ज्वेलरी डिझाइन अॅवॉर्ड्स २०१४’साठी येत्या १५ ऑगस्ट २०१४ पर्यंत प्रवेशिका दाखल करण्याचे आभूषणकारांना आवाहन केले आहे. या स्पर्धेचा निकाल डिसेंबर २०१४ मध्ये लागणार असून सर्वोत्तम आभूषणांना जीजेईपीसीची सदिच्छादूत अभिनेत्री सोनम कपूर तिच्या आगामी चित्रपटात परिधान करणार असून त्यायोगे भारतीय सिनेमाचा सुवर्णमहोत्सवही साजरा केला जाणार आहे.