म्युच्युअल फंड गंगाजळी ४ टक्के वाढून एकूण २४.८ लाख कोटींवर

मुंबई : एप्रिल २०१९ अखेर म्युच्युअल फंड उद्योगातील एकूण व्यवस्थापनयोग्य मालमत्ता (गंगाजळी) महिनागणिक ४ टक्के वाढून २४.८ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘अ‍ॅम्फी’द्वारे प्रसृत आकडेवारीनुसार, समभागसंलग्न फंडांमधील गुंतवणूक किंचित वाढली असली, तरी नियोजनबद्ध गुंतवणूक योजना अर्थात ‘एसआयपी’मधील गुंतवणूक ही ८,२३८ कोटी अशा सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे.

सरलेल्या एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांमधील एकूण १,००,४६० कोटी रुपयांचा गुंतवणूक ओघ हा मुख्यत: लिक्विड फंड आणि मनी मार्केट फंडांमधील गुंतवणुकीमुळे आहे. त्याच वेळी एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधून गुंतवणूकदार पैसा काढून घेताना दिसले.

लिक्विड आणि मनी मार्केट फंडांमध्ये एप्रिलमध्ये ९६,००० कोटी रुपये गुंतविले गेले तर त्या आधी मार्च महिन्यात याच फंडांमधून ५१,३४३ कोटी रुपये काढले गेले होते. लिक्विड फंडांमध्ये उद्योग क्षेत्राकडून अल्पकालीन गुंतवणूक मुख्यत: केली जात असते. आर्थिक वर्षांतील अखेरचा आगाऊ करभरणा करण्याचा हप्ता भरण्यासाठी मार्चमध्ये त्यांनी निधी काढून घेणे स्वाभाविक होते, जो एप्रिलपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षांत परतलेला दिसून येतो.

समभागसंलग्न (इक्विटी) फंडांमध्ये करबचत करणाऱ्या ईएलएसएस फंडांतील गुंतवणूक ही मार्चमधील ११,७५६ कोटी रुपयांच्या पातळीवरून एप्रिलमध्ये ४,२२९ कोटी रुपयांवर घसरली आहे. मुदतमुक्त समभागसंलग्न फंडांमध्ये ४,६०८ कोटी रुपयांचा ओघ, तर मुदतबंद फंडांमध्ये ३७९ कोटी रुपयांचे निर्गमन या महिन्यांत दिसून आले. एप्रिलमध्ये गुंतवणुकीतील बहर उत्साहवर्धक असल्याचे अ‍ॅम्फीने म्हटले आहे.

मे महिना अपवाद ठरेल काय?

मार्चमधील दमदार ओघ हा एप्रिलमध्ये काहीसा कायम राहिला, त्यामागे ते लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रात पुन्हा स्थिर सरकार येईल या आशेनेच प्रामुख्याने होता. परंतु निवडणूक प्रचाराचा हंगाम जसजसा पुढे सरकत आहे, ते पाहता निवडणुकांचे निकाल काय लागतील याबद्दल चिंता वाढू लागली आहे. याचे प्रत्यंतर भांडवली बाजारातील निरंतर घसरणीतही दिसत आहे. गुंतवणूकदारांनीही सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. २३ मेच्या निकालाची वाट पाहावी, मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा अशा सावधगिरीचा मे महिन्याच्या एकूण गुंतवणूक ओघावर परिणाम दिसून येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पुढील महिन्यात गुंतवणूक ओघ आटलेला दिसल्यास आश्चर्यकारक ठरू नये.

‘एसआयपी’ गुंतवणुकीचा बहर कायम

समभागसंलग्न फंडांमधील गुंतवणूक ओघ महिनागणिक चंचल राहिला असला, तरी नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेमार्फत (एसआयपी) समभागसंलग्न म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीने दर महिन्यात वाढीचा क्रम कायम ठेवला आहे. सरलेल्या एप्रिल महिन्यात तिने ८,२३८ कोटी रुपये अशा सार्वकालिक उच्चांक गाठला. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंड उद्योगासाठी ‘एसआयपी’कडील वाढता कल ही एक यशोगाथाच ठरली आहे. एसआयपी गुंतवणूक ओघातील हा वृद्धिदर कायम राहिल्यास आर्थिक वर्ष २०२० पर्यंत इक्विटी फंडातील दरमहा ओघ १,००,००० कोटी रुपयांवर जाण्याचे कयास आहेत.

समभागसंलग्न फंडांमधील वाढता ओघ आणि सरलेल्या एप्रिल २०१९ मधील म्युच्युअल फंड गंगाजळीतील वाढ हे छोटय़ा तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांचा देशाच्या आर्थिक वृद्धिगाथेतील वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे. एकूण खर्चात (टीईआर)मध्ये कपातीसारख्या ‘सेबी’ने राबविलेल्या सुधारणाही छोटय़ा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरल्या आहेत.

’  एन. एस. वेंकटेश, मुख्याधिकारी ‘अ‍ॅम्फी’