रिझव्‍‌र्ह बँके च्या अहवालात चिंतातूर गुंतवणूकदार कल

मुंबई : मागील वर्षभरात अर्थव्यवस्थेचा दर दशकातील नीचांकी असल्याचा परिणाम लोकांच्या बचतीवर झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतीय कुटुंबीयांनी कर्जाचे प्रमाण कमी करत वित्तीय साधनात बचत वाढविली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये बचतीचा दर विवेकी खर्चाच्या ७.६ टक्के होता. त्या आधीच्या वर्षी बचतीचा दर ६.४ टक्के होता.

अनेकांनी बचत ही भविष्यातील संभाव्य आव्हानात्मक दिवसांच्या बेगमीसाठी राखून ठेवल्याचे हा अहवाल सांगतो.

मागील दशकात दरडोई उत्पन्नात सर्वात कमी वाढ होऊनदेखील बचतीत झालेली वाढ भविष्यातील मोठय़ा मंदीची शक्यता व्यक्त करते. ग्राहक आपल्या विवेकी खर्चामध्ये कपात करत असून बचतीचे प्रमाण वाढवत असल्याने बाजारात वस्तूंची मागणी घटेल, अशी शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ग्राहकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले असून लोकांचा कल खर्चापेक्षा संचयनाकडे वाढल्याने बचत बँक ठेवींमध्ये जास्त झाली आहे.

गुंतवणूकदारांचा कल जोखीम टाळण्याकडे असल्याने गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्यायांना गुंतवणूकदार प्राधान्य देत आहेत. मागील वर्षांत मोठय़ा प्रमाणात म्युच्युअल फंडांकडून कमी जोखमीच्या विमा कंपन्यांच्या सेवानिवृत्ती योजनांमध्ये बचत संक्रमित झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.