सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे पुनरुज्जीवन, परिवहन क्षेत्रातील पायाभूतसुविधांची सुधारणा, इ-कॉमर्सच्या क्षेत्रातील प्रवेश, नियोजित वस्तू व सेवा कर  अंमलबजावणी आणि ‘मेक इन इंडिया’चा पुढाकार या सर्वाचा परिणाम म्हणून भारतातील माल वाहतूक (लॉजिस्टिस्क) क्षेत्रदेखील हे वेगवान विकासासाठी सज्ज झाले आहे. नव्या घडामोडीच्या पाश्र्वभूमिवर या क्षेत्रावर प्रकाश टाकणाऱ्या क्षेत्रावरील प्रदर्शन येत्या गुरुवारपासून मुंबईत होत आहे. देशाच्या आर्थिक तसेच दळणवळण क्षेत्राच्या दृष्टिने महत्त्वाचे ‘गेट वे’ असलेल्या शहरात तब्बल १४ वर्षांनी हे प्रदर्शन होत आहे.
‘फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया’ (एफएफएफएआय) ही देशातील २४ सदस्य असलेल्या संघटनांची सर्वात जुनी आणि एकमेव शिखर संस्था आहे. तिचे देशभरात ५०० सीमाशुल्क दलाल आणि मालवाहतूक हाताळणीदार आहेत. तर या क्षेत्रातील कर्मचारीसंख्या एक लाखाहून अधिक आहे. देशातील आंतरराष्ट्रीय माल वाहतुकीचा ९० टक्के व्यापार या व्यवस्थेच्या नियंत्रणात असून ‘एफएफएफएआय’चे तिच्या नेतृत्वाखाली हे द्वैवार्षकि अधिवेशन होत आहे.
याबाबत अधिवेशनाचे अध्यक्ष अमित कामत यांनी सांगितले की, गेल्या दोन दशकांमध्ये सीमाशुल्क दलालांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात निर्यातीत भारताची उलाढाल ही ३१२ अब्ज डॉलर इतकी असून आयातीतील उलाढाल ही ४८० अब्ज डॉलर इतकी आहे. या विकासात सीमाशुल्क दलालांचे योगदान महत्त्वाचे असून या विकासातून नफाही झाला आहे.
देशाची ‘मेरिटाइम’ राजधानी असलेल्या मुंबईत हे २२ वे अधिवेशन होत आहे. २१ ते २३ मे या कालावधीत ते सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. ‘भारताची प्रेरणा : संशोधनातील झेप, प्राविण्य, या क्षेत्रातील वेग’ ही या अधिवेशनाची संकल्पना आहे.
या द्वैवार्षकि अधिवेशनाच्या माध्यमातून हे व्यासपीठ या क्षेत्रातील सदस्यांना उद्योगातील बदल, त्यातील प्रेरकशक्ती तसेच सर्वोत्तम पद्धती आणि मानके यांचे आदानप्रदान करण्यासाठी मंच उपलब्ध करून देईल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे. या माध्यमातून उद्योजकांचा अडचणी दूर करण्याच्या हेतूने चर्चा करण्यात येणार आहे.
सुरक्षितता आणि संरक्षण, सौदेबाजीचे महत्त्व, उत्पादनप्रक्रियेतील पद्धती आणि तंत्रज्ञान आदी जगभरातील तंत्रज्ञान आणि जागतिक बदलांकडे एफएफएआय लक्ष वेधले आहे, असेही कामत यांनी सांगितले.