इलेक्ट्रॉनिक विश्वात आपल्या नावाचा दबदबा आणि विश्वास निर्माण करणाऱ्या ‘सोनी’ या जपानी कंपनीला सध्या १.०८ अब्ज डॉलरच्या वार्षिक नुकसानीचा सामना करावा लागत असून, यातून बाहेर पडण्यासाठी कंपनीने संगणक संचनिर्मिती क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्बल ५ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड चालविली जाणार आहे.
जपानमधील शार्प, पॅनासॉनिक या कंपन्यांसह सोनीलाही गेल्या काही महिन्यांपासून स्पर्धक कंपन्यांचा तीव्र सामना करावा लागत आहे. परिणामी संगणकनिर्मितीऐवजी दूरचित्रवाणी व मोबाइल (स्मार्टफोन) व्यवसायावर भर देण्याचे पाऊल कंपनी उचलत आहे. दूरचित्रवाणी क्षेत्रात दक्षिण कोरियाच्या सॅमसंग तसेच मोबाइलमध्ये अमेरिकेच्या अ‍ॅपलच्या वाढत्या मागणीचा परिणाम सोनी कंपनीवर झाला आहे. त्यामुळे चालू वित्तवर्ष अखेर कंपनी १.०८ अब्ज डॉलरच्या तोटय़ाचा सामना करण्याची शक्यता आहे. मूडीजने पतमानांकन कमी केल्याच्या धक्क्यातून बाहेर येत नाही तोच हे पाऊल उचलण्यात येत आहे. सोनीचा दूरचित्रवाणी संचनिर्मिती व्यवसायही फार फायद्यात आहे, असेही नाही.
याअंतर्गत वायो नाममुद्रेंतर्गत तयार करण्यात येणारा संगणकनिर्मिती व्यवसाय जपानच्याच एका गुंतवणूक निधी कंपनीला विकून (हा व्यवहारही ४० कोटी डॉलरचा असू शकेल.) कर्मचारी कपातीद्वारे १ अब्ज डॉलरची बचत करण्याचा इरादा कंपनीने जाहीर केला आहे. दरम्यान, कंपनी ब्रॅव्हिआसारखे महागडे दूरचित्रवाणी संच व प्लेस्टेशनसारखी संगीत उपकरणे कायम ठेवील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्मार्टफोनमध्ये सॅमसंग, अ‍ॅपल आघाडीवर आहे, तर पॅनासॉनिकही आता या क्षेत्रात नव्याने उतरत आहे. एक्सपेरियाद्वारे सोनी कंपनी या क्षेत्रात अधिक विस्तार करील, तर संगीतविषयक उपकरणे, लॅपटॉप, नोटबुकमध्येही तूर्त कार्यरत राहील, अशी चिन्हे आहेत.