मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने सणोत्सवाची भेट म्हणून गृहकर्जावरील व्याजदरात कपात करत तो आता ६.७० टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. शिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क न आकारण्याचे बँकेने जाहीर केले आहे. मात्र ही गृहकर्ज सवलत उत्सवी काळापुरतीच मर्यादित राहणार आहे.

गृह कर्जाची कितीही मोठी रक्कम असली तरी ती ६.७० टक्के इतक्या कमी व्याजदराने उपलब्ध केली जाणार आहे. सवलतीच्या व्याजदराने गृहकर्ज देण्याची ही मोहीम दोन टप्प्यात राबवली जाणार आहे. पहिला टप्पा १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चालवला जाईल, तर दुसरा टप्पा १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक उमेशकुमार पांडे यांनी शुक्रवारी दिली.  गुरुवारी व्याजदर कपातीची घोषणा करताना बँकेने ती केव्हापासून लागू होणार हे जाहीर केले नव्हते.

‘पीएनबी’कडून कपात

पंजाब नॅशनल बँकेने देखील उत्सवी काळात रेपो दराशी निगडित कर्जाच्या दरात पाव टक्का कपात केली आहे. आता व्याजदर ६.८० टक्क्यांवरून कमी होत ६.५५ टक्क्यांवर आला आहे. नवीन दर १७ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत.