मुंबई : भांडवली बाजाराच्या नव्या सप्ताहाचे व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सोमवारी सावध सुरुवात केली. सत्रातील ७५० अंश झेपनंतर सेन्सेक्स मात्र अखेर काही प्रमाणात घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात नाममात्र वाढ झाली.

मुंबई निर्देशांक सोमवारअखेर शुक्रवारच्या तुलनेत ६३.८४ अंश घसरणीसह ४८,७१८.५२ वर स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांक अवघ्या ३.०५ अंशांनी वाढून १४,६३४.१५ पर्यंत थांबला.

शुक्रवारच्या तुलनेत नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात ७५० अंशपर्यंत झेप घेतली होती. मात्र दिवसअखेर निर्देशांकांवर विक्रीदबाव निर्माण होत मुंबई निर्देशांकाने तेजीपासून माघार घेतली. सेन्सेक्समध्ये टायटन सर्वाधिक ४.५८ टक्क्य़ांनी आपटला. तसेच इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक, आयटीसी, स्टेट बँक, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक हेही घसरले. ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा, बँक, वित्त निर्देशांक घसरले.