एस्सेल समूहाकडून कंपनीतील १६.५ टक्के हिस्सा विक्री:- मुख्य प्रवर्तक एस्सेल समूहावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी उद्योजक सुभाष चंद्रा गोयल यांनी झी एंटरटेनमेंटमधील हिस्सा विकण्याच्या निर्णय घेतला आहे. परिणामी त्यांचे माध्यम, मनोरंजन व्यवसायावरील मालकी आणि नियंत्रणही गमावले जाणार आहे.  झी एंटरटेनमेंटमधील १६.५ टक्के हिस्सा चीनच्या ओएफआय ग्लोबल या वित्तसंस्थेला विकण्यासंबंधी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत.  यानंतर भांडवली बाजारात सूचिबद्ध माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील झी एंटरटेन्मेंट लिमिटेडमध्ये गोयल यांचे भागभांडवल अवघे ५.८७ टक्क्यांपर्यंत संकोचणार आहे.

झी एंटरटेनमेंटमध्ये एस्सेल समूहाचा सध्या (सप्टेंबर २०१९ अखेर) २२.३७ टक्के हिस्सा आहे. पैकी ९० टक्के हिस्सा हा समूहाला अपरिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांकडे गहाण ठेवण्यात आला आहे. समूहावरील ६,००० कोटी रुपयांचा कर्जभार कमी करण्यासाठी एस्सेलने यापूर्वीही एकदा प्रयत्न केला होता. समूहाने सप्टेंबरमध्ये झी एंटरटेनमेंटमधील ११ टक्के हिस्सा ४,२२४ कोटी रुपयांना इन्व्हेस्को-ऑपेनहायमर या मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक कंपनीला विकला होता.

अंटलांटास्थित इनव्हेस्को झी एंटरटेनमेंटमध्ये २००२ पासून ७.७४ टक्के हिस्सा राखून होती. समूहाने यापूर्वीही माध्यम, मनोरंजन क्षेत्रातील कंपनीतील हिस्सा विक्रीची तयारी यापूर्वीही दर्शविली होती. एस्सेल समूहातील भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांकडून वित्तसंस्था, म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीनंतर वर्ष २०१८ च्या अखेरीस समूहाच्या थकीत कर्जाच्या हप्त्यांच्या परतफेडीतील अपयश एकूणच वित्तीय जगतात चर्चेत आले आहे. एस्सेल समूहाने कर्जाची रक्कम १७,००० वरून कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. गेल्या काही महिन्यांमध्ये ते ६,००० कोटींवर आले. मात्र ते निर्धारीत कालावधीत  शून्यावर आणण्याचे समूहाचे लक्ष्य अद्यापही पूर्ण झालेले नाही.