‘नॅसकॉम’ परिषदेत मत-मतांतराचे प्रदर्शन
विदेशी चलनाच्या रूपात अधिकाधिक महसूल गोळा करणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या संघटनेने भक्कम अमेरिकी डॉलरचा अल्प कालावधीसाठी लाभ होण्याची शक्यता वर्तविताना, ढासळत्या युरोमुळे मात्र महसुलावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.
देशातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या नॅसकॉमची दोन दिवसीय विशेष परिषद मुंबईत गुरुवारपासून सुरू झाली. परिषदेत संघटनेचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी आयटी क्षेत्राच्या १२ ते १४ टक्के व्यवसाय वाढीबाबत आशा व्यक्त केली.
१५० अब्ज डॉलरचे महसुली उत्पन्न मिळविणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांना मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी ७० टक्के महसूल हा उत्तर अमेरिका, तर २० टक्के महसूल युरोप भागातून मिळतो. भारतीय चलनाच्या तुलनेत सध्या डॉलर भक्कम आहे. तर युरोचे अवमूल्यन होत आहे.
या पाश्र्वभूमीवर घसरत्या युरोचा आयटी कंपन्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे चंद्रशेखर म्हणाले. तर उलट भक्कम डॉलरमुळे कंपन्यांना अल्प कालावधीसाठी लाभ पदरात पाडून घेता येईल, असे त्यांनी नमूद केले. नॅसकॉमच्या वार्षिक महसुली वाढीच्या उद्दिष्टावर मात्र या चलन भिन्नतेचा थेट परिणाम होणार नाही, असे नमूद करत चंद्रशेखर यांनी मात्र कंपन्यांच्या ग्राहकांकडून या सेवेवरील खर्च कमी होण्याची शंका उपस्थित केली.
मंदावलेल्या चिनी अर्थव्यवस्थेचा एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवण्याचा उल्लेख करत चंद्रशेखर यांनी तेल, इंधन, वायदा वस्तू आदींच्या किमती या क्षेत्रातील ग्राहक कंपन्यांच्या माहिती तंत्रज्ञान सेवेवरील खर्चात कपात करण्यास कारणीभूत ठरतील, असे स्पष्ट केले.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला असला, तरी युरोसमोर तो वधारला असल्याची बाब कंपन्यांच्या महसूल चिंतेत भर घालणारी आहे, असेही ते म्हणाले. चलनातील अस्थिरता ही उद्योगासाठी योग्य नसून देश पातळीवर रिझव्‍‌र्ह बँक त्यात प्रसंगी हस्तक्षेप करेल, अशी अपेक्षाही चंद्रशेखर यांनी व्यक्त केली.