डिजिटल बँकिंग, व्यवसाय प्रक्रियांची पुन:स्थापना, विक्री व विपणन तसेच मनुष्यबळ विकास या चारही अंगांनी विशेष मेहनत घेऊन ग्राहकांना सुधारित व सर्वोत्तम श्रेणीची सेवा प्रदान करणाऱ्या ‘अनन्य’ शाखांचा उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने हाती घेतला आहे. या उपक्रमांतील पहिली अनन्य शाखा बुधवारी बँकेच्या नरिमन पॉइंटस्थित शाखेला नवे रूप देऊन सुरू करण्यात आली.

सिंडिकेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण श्रीवास्तव यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले. या नव्या उपक्रमांतून बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होऊन ग्राहकांना स्वागत संचामध्ये खाते क्रमांक, डेबिट कार्ड व अन्य उपयुक्त सामग्रीही ताबडतोब प्रदान केली जाणार आहे. आजवर या प्रक्रियेसाठी दीड ते दोन दिवसांचा कालावधी जात असे.

मुंबईत आणखी तीन शाखा लवकरच अनन्य शाखेत परिवर्तित करण्याचा मानस असल्याचे बँकेचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक टी. रवींद्रनाथ यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने देशभरातील बँकेच्या सर्व शाखांमध्ये या ‘अनन्य’ शाखा बनतील आणि ग्राहकांना आधुनिक धाटणीच्या सेवा देऊ लागतील, असे त्यांनी सांगितले.