टाटा ग्लोबल बेव्हरेजेसकडे

मुंबई : टाटा समुहाच्या व्यवसाय पुनर्बाधणी अंतर्गत बुधवारी पहिले पाऊल टाकण्यात आले. टाटा केमिकल्स अंतर्गत ग्राहकपयोगी वस्तू व्यवसाय टाटा समुहातील अन्य एक उपकंपनी टाटा ग्लोबल बेव्हरेजेसकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. याद्वारे ९,००० कोटी रुपयांची चहा, कॉफी तसेच अन्य पेय उपकंपनी अस्तित्वात आली.

टाटा समुहाच्या पुनर्बाधणीचे संकेत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी नुकतेच दिले होते. परिणामी टाटा मोटर्स अंतर्गतील जग्वार अँड लँड रोव्हरच्या विक्रीचीही चर्चा सुरू झाली होती. तर टाटा स्टीलचा विदेशातील व्यवसाय कमी करण्याची अटकळही निर्माण झाली. चंद्रशेखरन यांनी मात्र टाटा स्टीलबाबत असा निर्णय घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

टाटा टी, टेटली, टाटा कॉफी ग्रँड, हिमालयान आदी नाममुद्रेंतर्गत विविध खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या टाटा ग्लोबल बेव्हरेजेसचे आता टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड असे नामांतर करण्यात आले आहे. तर टाटा केमिकल्स अंतर्गत असलेले मीठ, सोडा, लोणची उत्पादने आता नव्या कंपनीच्या पंखाखाली येतील.

टाटा ग्लोबल बेव्हरेजेस व टाटा केमिकल्सची या बदलाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बुधवारी स्वतंत्र बैठक झाली. यानंतर टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. मुकुंदन व टाटा ग्लोबल बेव्हरेजेसचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अजोय मिश्रा यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी घेतलेल्या निर्णयानुसार, टाटा केमिकल्सच्या प्रत्येक भागधारकाला टाटा ग्लोबल बेव्हरेजेसचे १.१४ नवे समभाग मिळणार आहेत.

टाटा सन्सच्या टाटा ग्लोबल बेव्हरेजेसचा वार्षिक ताळेबंद बुधवारी सादर करण्यात आला. त्यात कंपनीच्या भागधारकांना उद्देशून चंद्रशेखरन यांनी, उपकंपनीला जागतिक स्तरावर अधिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.