इंटरनेटसाठी डेस्कटॉप, लॅपटॉप, नोटबुक, आयपॅड तसेच स्मार्टफोनलाही जोडणारे वाय – फाय डोंगल टाटा टेलिकम्युनिकेशनने विकसित केले आहे. तूर्त त्याची चाचणी सुरू असून येत्या महिन्यात ते पहिल्यांदा मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होईल. देशातील अशाप्रकारचा हा पहिला प्रयोग ठरणार आहे.
थ्रीजी तंत्रज्ञानावर ९.३ एमबीपीएस वेग देणारे हे डोंगल बॅटरीवर कार्यरत राहणार असून याद्वारे व्हॉईस तसेच डाटा कनेक्टिव्हिटीदेखील मिळू शकेल. ‘हुवाई’ कंपनीने याकामी टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसला तांत्रिक सहकार्य केले आहे. टाटा फोटोन प्लसच्या तुलनेत हा पर्याय अधिक महागडा असण्याची शक्यता आहे.
टाटा डोकोमो या कंपनीच्या ब्रॅण्डच्या मुंबई, उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मोबाईल व्यवसाय विभागाचे प्रमुख आदित्य गुप्ता यांनी याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले की, सर्व माहिती तंत्रज्ञानावर चालू शकणारा एकच पर्याय प्रायोगिक तत्त्वावर असून महिन्याभरात हे उत्पादन प्रत्यक्षात मुंबईत उपलब्ध होईल.
मुंबई आणि नजीकच्या परिमंडळात कंपनीचे एकूण ९० लाखांहून अधिक ग्राहक आहेत. सीडीएमए तसेच जीएसएम मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसला तिच्या एकूण महसुलापैकी ४० टक्के महसूल हा टाटा फोटोन प्लस या डाटाकार्डसारख्या व्यवसायातून मिळतो.  ही श्रेणी विस्तारताना कंपनीने आता फोटोन मॅक्स हे ६.२ एमबीपीएस वेगाचे डाटाकार्ड मुंबईत सादर केले आहे.
सीडीएमए तंत्रज्ञानावरील हे डाटाकार्ड थ्रीजीशी तुलना करणारे असून त्याची किंमत १,६९९ रुपये आहे. मुंबईनंतर ते लवकरच पुण्यातही उपलब्ध होईल.