वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) पहिल्याच महिन्यात जमा झालेल्या ९५,००० कोटी रुपयांपैकी ६५,००० कोटी रुपये हे परताव्याचे (इनपूट क्रेडिट) आहेत. परिणामी सरकारच्या तिजोरीत या करापोटी केवळ ३०,००० कोटी रुपयेच जमा होणार आहेत.

‘जीएसटी’पोटी पहिल्याच महिन्यात तब्बल ९५,००० कोटी रुपये जमा झाल्याचा गवगवा सरकारने केला होता. मात्र सवलतीचा लाभ मिळणाऱ्या करदात्यांची परतावा रक्कम ही ६५,००० कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. यानुसार ही रक्कम करदात्या व्यापाऱ्यांना पुन्हा मिळणार आहे. परतावा सवलत जुलै ते डिसेंबर दरम्यानसाठी आहे.

जुलै महिन्यासाठी भरलेल्या कराकरिता व्यापाऱ्यांना ‘टीआरएएन-१’ भरून कर परतावा मिळण्याची सुविधा आहे. खरेदी केलेल्या वस्तूवरील कर सवलतीकरिता ही सुविधा आहे. यासाठी व्यापाऱ्यांना आधी कर भरून नंतर परतावा मिळण्याची सोय आहे. वस्तू व सेवा करांतर्गत नोंदणीकृत ५९.५७ लाख करदात्यांपैकी ७० टक्के करदात्यांनी जुलैमध्ये परताव्यासाठी नोंदणी केली आहे. परताव्यासाठी व्यापाऱ्यांना ९० दिवसांत दावा करणे आवश्यक आहे.

वस्तू व सेवा कराच्या १८ टक्के कर टप्प्यात येणाऱ्या परतावापात्र करदात्यांचे प्रमाण ४० टक्के आहे.

दरम्यान, वस्तू व सेवा कर प्रक्रियेसाठीच्या ‘जीएसटी नेटवर्क’ची पहिली बैठक शनिवार, १५ सप्टेंबर रोजी बेंगळूरुत होत आहे. परताव्यासाठी प्रक्रिया पार पाडताना करदात्यांना मोठय़ा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. यानंतर याबाबत पाच सदस्यीय तांत्रिक समिती लक्ष घालेल, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. शनिवारच्या बैठकीला बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, तेलंगणाचे अर्थमंत्री ई. राजेंदर हे समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

एक कोटींपेक्षा अधिक रकमेचे  परतावा दावे तपासाच्या कक्षेत

एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या परताव्याचा दावा करणारी प्रकरणे केंद्रीय उत्पादन व सीमाशुल्क मंडळाच्या नजरेखाली असून अशा १६२ कंपन्या, संस्थांच्या तपासाचे आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंडळाचे सदस्य महेंदर सिंग यांनी याबाबत सर्व मुख्य आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या संदर्भात येत्या २० सप्टेंबपर्यंत आयुक्तांना अहवाल सादर करावयाचा आहे. परताव्याची एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम असलेल्या प्रकरणांची कसून चौकशी करण्यास बजाविण्यात आले आहे.

१०.२९ टक्के निर्यातवृद्धी;  व्यापार तुटीतही वाढ

नवी दिल्ली : गेल्या महिन्यातील देशाची निर्यात चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. भारताने ऑगस्टमध्ये २३.८१ अब्ज डॉलर निर्यात नोंदविताना त्यात वार्षिक तुलनेत १०.२९ टक्के वाढ राखली आहे.

ऑगस्टमध्ये आयात ३५.४६ अब्ज डॉलर झाली असून त्यात यंदा २१.०२ टक्क्यांनी वाढली आहे. परिणामी आयात-निर्यातीतील व्यापार तुटीची दरी रुंदावत ११.६४ अब्ज डॉलर झाली आहे.वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१६ मध्ये ७.७० अब्ज डॉलर असलेली व्यापार तूट यंदा सोने आयातीमुळे वाढली आहे. सोने आयात यंदा तब्बल ६९ टक्क्यांनी वाढून १.८८ अब्ज डॉलर झाली आहे, तर तेल आयात १४.२२ टक्क्यांनी वाढून ७.७५ अब्ज डॉलर झाली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या पहिल्या पाच महिन्यांत भारताची निर्यात ८.५७ टक्क्यांनी वाढून ११८.५७ अब्ज डॉलर झाली आहे. तर आयात २६.६३ टक्क्यांनी वाढत १८१.७१ अब्ज डॉलर झाली आहे. या दरम्यान व्यापार तूट ६३.१४ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.