परातींसाठी धातूच्या पाइप्सच्या मागणीत चारपटीने वाढ !

पिंपासाठी धातूच्या झाकणातील जगातील दुसऱ्या क्रमांकाची निर्माता व निर्यातदार कंपनी टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजने आपली अन्य दोन नवीन व्यवसाय क्षेत्रे म्हणजे वस्त्रोद्योग आणि बांधकामासाठी वापरात येणाऱ्या पराती उभारण्यासाठी धातूच्या पाइप्सच्या व्यवसायातून येत्या काळात वाढीव महसुली योगदानाचा विश्वास व्यक्त केला आहे. अमरावती येथील वस्त्रोद्योग उद्यानात नवीन प्रकल्पांसाठी कंपनीकडून ८० कोटींच्या गुंतवणुकीचेही नियोजन आहे.

बांधकामासाठी वापरात येणाऱ्या परातींच्या पाइप्सचा (स्कॅफॉल्डिंग पाइप्स) व्यवसाय झपाटय़ाने वाढत असून, वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने उत्पादन क्षमता तिपटीने वाढविली आहे, असे टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इं.) लि.चे वरिष्ठ उपाध्यक्ष मुदित रानीवाला यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. ‘निर्यात गृह’ म्हणून भारत सरकारकडून दर्जा प्राप्त करणाऱ्या या कंपनीला स्कॅफॉल्डिंग व्यवसायासाठी देशांतर्गत मागणीत नजीकच्या काळात चार पटीने वाढ होण्याची आशा असून, सध्या २५ कोटींच्या घरात असलेला व्यवसाय चालू वित्त वर्षांत १०० कोटींवर जाईल, असे रानीवाला यांनी स्पष्ट केले.

पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारचा सुस्पष्ट भर, या क्षेत्रातील प्रकल्पांमधील गतिमानता, त्याचप्रमाणे स्थावर मालमत्ता क्षेत्र, संरक्षण क्षेत्र आदींमधून स्कॅफॉल्डिंग व्यवसायाला सध्या ४० कोटी रुपयांच्या घरात मागणी नोंदविली गेली आहे. देशी मागणी व निर्यात मिळून स्कॅफॉल्डिंग व्यवसायाचा एकूण उत्पन्नातील वाटा ३५० ते ४०० कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे रानीवाला यांनी स्पष्ट केले. मार्च २०१७ अखेर कंपनीने लेखापरीक्षित निष्कर्ष जाहीर केले नसले, तरी एकूण उत्पन्न १,१०० कोटी रुपयांचे असेल. त्यामुळे कंपनीच्या तिन्ही प्रमुख व्यवसायांचे महसुलात योगदान समान स्तरावर येईल, असे रानीवाला यांनी सूचित केले.

विजेच्या पारेषणाचे खांब तसेच दूरसंचार मनोऱ्यांच्या उभारणीत कंपनीची उत्पादने वापरात येत असून, या क्षेत्राने घेतलेली उभारी कंपनीच्या पथ्यावर पडेल. उल्लेखनीय म्हणजे या क्षेत्रात कंपनीला भारतात अन्य कोणीही स्पर्धक नाही, तर चीनमधून हलक्या दर्जाच्या उत्पादकांना कंपनीने समर्थपणे तोंड दिले आहे; किंबहुना महाराष्ट्रातील मुरबाड येथे कंपनीचे विविध सहा उत्पादन प्रकल्प असून, निर्यात मागणीच्या पूर्ततेसाठी चीनमध्ये भागीदारीतील प्रकल्प कंपनीने कार्यान्वित केला आहे. मुख्य कच्चा माल असलेल्या पोलादाच्या किमतीतील चढ-उतारांचा खर्चावर परिणाम होणार नाही, यासाठी घेतली गेलेली काळजीही कंपनीच्या महसुली कामगिरीत सुधारणेसाठी उपकारक ठरेल. तसेच कंपनीची विजेची गरज १५ मेगाव्ॉटच्या स्व-मालकीच्या वीज प्रकल्पातून भागविला जात आहे, त्यामुळे दर्जा व किमतीबाबत टेक्नोक्राफ्टला कोणी स्पर्धक पुढे येण्याची शक्यताही दिसून येत नाही.