देशातील प्रमुख क्षेत्रात जूनमध्ये वाढ

देशाच्या प्रमुख आठ क्षेत्रामध्ये गेल्या महिन्यात वाढ नोंदली गेली आहे. नैसर्गिक वायू, स्टील, कोळसा आदी क्षेत्रात वाढती मागणी राहिल्याने जूनमधील प्रमुख क्षेत्र सकारात्मक बनले आहे.

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि वीज या आठ क्षेत्रांचा प्रमुख क्षेत्र म्हणून समावेश होतो. वर्षभरापूर्वी, जून २०२० मध्ये हे क्षेत्र उणे होते. मार्च २०२० अखेरीसच्या जाहीर टाळेबंदीचा हा कालावधी होता.

यंदाच्या मेमध्ये प्रमुख क्षेत्राने १६.३ टक्के वाढ नोंदली. तर त्याआधीच्या महिन्यात, एप्रिलमध्ये ती तब्बल ६०.९ टक्के राहिली होती.

यंदाच्या जूनमधील प्रमुख क्षेत्राची वाढ वार्षिक तुलनेत सकारात्मक राहिली असली तरी मासिक तुलनेत ती निराशाजनक नोंदली गेली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात कोळसा, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, स्टील, सिमेंट, वीज निर्मिती वार्षिक तुलनेत वाढली आहे. हे सारे क्षेत्र वर्षभरापूर्वी, याच कालावधीत उणे स्थितीत होते. तर यंदा खनिज तेल निर्मिती १.८ टक्क्य़ांनी घसरली आहे. खतनिर्मिती क्षेत्रात २ टक्के वाढ झाली आहे.

एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रमुख आठ क्षेत्राची वाढ २५.३ टक्के राहिली आहे. उत्तम मान्सूनच्या जोरावर क्षेत्राचा कल असाच वाढता राहिला तर जुलै २०२१ मध्ये ११ ते १४ टक्क्य़ांपर्यंत असू शकतो, असे ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले.