अ‍ॅपलने स्ट्रीमिंग म्युझिक सव्‍‌र्हिस सुरू केली असून स्पॉटिफाय व पँडोरा या सेवांना स्पर्धा करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अ‍ॅपलची ही सेवा सशुल्क आहे.
अ‍ॅपल म्युझिक ही सेवा आयफोन व आयपॅडवर ३० जूनला १०० देशात उपलब्ध होणार आहे. त्यात व्यक्तिगत रेडिओ स्टेशनही असेल. त्यात तुम्हाला कलाकारांमधून, तसेच लाखो गाण्यांमधून तुमच्या निवडीचे गाणे ऐकता येईल. तुम्हाला पाहिजे ते गाणे, हवे तेव्हा ऐकता येईल.
अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी सांगितले की, अ‍ॅपल म्युझिक सव्‍‌र्हिस ही संगीतसेवेतील पुढची पायरी आहे व त्यामुळे संगीताचा अनुभव कायमचा बदलणार आहे. महिन्याला ९.९९ डॉलर्स देऊन ही सेवा घेता येईल. सहा व्यक्तींसाठी १४.९९ डॉलर्सना फॅमिली प्लान दिला जाईल. ऑनलाईन संगीताच्या सेवात सध्या अनेक गोंधळ आहेत, त्यातील अ‍ॅप्स गुंतागुंतीचे आहेत, त्यामुळे ‘अ‍ॅपल म्युझिक’ ही वेगळी वैशिष्टय़े घेऊन सादर करण्यात आलेली योजना आहे. बीटस १ हे लाइव्ह रेडिओ स्टेशन, संबंधित कलाकार किंवा तुम्हाला आवडणारी गाणी निवडण्याची सुविधा व संग्रहाची यादी, सोशल म्युझिक नेटवर्क ही त्याची वैशिष्टय़े आहेत. यात सोशल नेटवर्कमध्ये तुम्ही संगीतावर प्रतिक्रिया देऊ शकता. आपल्याला संगीताचे प्रेम आहे व सर्वानाच संगीताचा अविस्मरणीय अनुभव यात घेता येणार आहे, असे इंटरनेट सॉफ्टवेअर अँड सव्‍‌र्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष एडी क्यू यांनी सांगितले.

‘टॅप टू पे’ मोबाइल पेमेंट सेवा आयफोनवर उपलब्ध
अ‍ॅपलने ब्रिटनमध्ये पुढील महिन्यात टॅप टू पे मोबाइल पेमेंट यंत्रणा सादर करणार आहे, त्यासाठी आयफोनचा वापर करता येईल व या माध्यमातून लंडनच्या मेट्रोपासून इतर ठिकाणी अडीच लाख रुपये तुम्ही अदा करू शकाल. अ‍ॅपलच्या जेनीफर बेली यांनी डेव्हलपर्स परिषदेत सांगितले, की अ‍ॅपल पे सुविधा आम्ही ब्रिटनमध्ये उपलब्ध करून देत आहोत व ती पुढील महिन्यात आठ लोकप्रिय बँकांच्या माध्यमातून राबवण्यात येईल. अ‍ॅपल पे सुविधा अमेरिकेतील ग्राहकांसाठी गेल्याच वर्षी राबवण्यात आली होती. यात आयफोनवर टॅप करून व्यावसायिक आस्थापनांच्या ठिकाणी तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डाच्या मदतीने पैसै अदा करू शकता. गुगलनेही गेल्या महिन्यात अशीच यंत्रणा अँड्रॉइड हँडसेटच्या मदतीने लागू करू असे म्हटले, पण त्यासाठी तारीख मात्र निश्चित केली नव्हती.