रिझव्र्ह बँकेकडून देयक (पेमेंट) बँकेचा परवाना तत्त्वत: मिळविलेल्या फिनो पेटेकने परकीय चलन विनिमय व्यवसायातील थॉमस कुकसोबत करार केला असून, त्यायोगे आता १४ राज्यातील फिनो पेटेकच्या ४०० मनी मार्ट व ३० हजार सेवा केंद्रामधून नागरिकांना परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना पैसे हस्तांतरित करता येतील.
बँकेपासून वंचित असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या फिनो पेटेकने बँकेत खाते नसतानाही देशातल्या कोणत्याही राज्यात व कोणत्याही बँकेत पैसे पाठविण्याच्या सुविधेला चांगला प्रतिसाद लाभत असून गेल्या आर्थिक वर्षांत ३००० कोटी रुपयाचा निधी देशांतर्गत हस्तांतरित (रेमिटन्स) झाला असून गतवर्षांच्या तुलनेत त्यात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. थॉमस कुकसोबत झालेल्या करारामुळे आता परदेशातही पैसे हस्तांतर (रेमिटन्स) करता येणार असून त्याचा फायदा ग्रामीण व छोटय़ा शहरांतील नागरिकांना होणार आहे, असे मत फिनो पेटेकचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी गुप्ता यांनी व्यक्त केले.