रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरपद किमान चार वर्षांसाठी हवे; संसदीय समितीपुढे युक्तिवाद

आपला नियोजित कार्यकाळ मावळतीला असताना, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखाला थोडा अधिक अवधी मिळायला हवा, ही भूमिका मांडणारा गुरुवारी युक्तिवाद केला. जगभरात प्रचलित असलेली पद्धत अनुसरायची झाल्यास किमान चार वर्षांचा कार्यकाळ मिळायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.
संसदेच्या वित्तविषयक स्थायी समितीपुढे गव्हर्नर राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंविषयी, प्रामुख्याने बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाबाबत सविस्तर विवेचन केले. समितीनेच रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांचा कार्यकाळ किती असावा, या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश असलेल्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली हे आहेत. समितीच्या सदस्यांचा राजन यांच्याशी हा वार्तालाप सुमारे तीन तास सुरू होता, असे सूत्रांकडून समजते. या बैठकीला येण्यापूर्वी राजन यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक या मुख्यालयात अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली.
तीन वर्षांची मुदत खूपच तोकडी असल्याचे राजन यांनी संसदीय समितीच्या सदस्यांना स्पष्टपणे सांगितले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हचा हवाला देताना, तेथे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला चार वर्षांचा कार्यकाळ मिळतो आणि त्यांची पुनर्नियुक्तीही केली जाते. राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या ४ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असून, त्यांनी गव्हर्नरपदी मुदतवाढीतून पुनर्नियुक्तीऐवजी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय पंधरवडय़ापूर्वी जाहीर केला आहे.
संसदीय समितीच्या सदस्यांना राजन यांनी बँकांच्या बुडीत कर्जाच्या समस्येसंबंधाने योजण्यात आलेल्या उपायांची माहिती दिली. गत सप्ताहअखेर आलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या वित्तीय स्थिरता अहवालानुसार, मार्च २०१७ अखेर देशाच्या बँकिंग क्षेत्रातील बुडीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण हे एकूण वितरित कर्जाच्या ९.३ टक्क्यांवर जाण्याचा, म्हणजे गेल्या १२ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बँकांचा पतपुरवठा, विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची त्या संबंधाने भूमिका, ‘ब्रेग्झिट’ घडामोडीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ घातलेला परिणाम याबद्दलही राजन यांनी खासदारांचे मार्गदर्शन केले.

सुयोग्य वारसदार लवकर निवडा- फोर्ब्स
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या जागी सुयोग्य व्यक्तीची नियुक्ती लवकरच होईल, अशी आशा ‘सीआयआय’ उद्योग संघटनेचे अध्यक्ष नौशाद फोर्ब्स यांनी व्यक्त केली. रिझव्‍‌र्ह बँकेतून राजन यांच्या निर्गमनाने अर्थव्यवस्था वा गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता मात्र फोर्ब्स यांनी फेटाळून लावली आहे.