पती अध्यक्ष असलेल्या रिलायन्स- अनिल धीरुभाई अंबानी समूहात (रिलायन्स-एडीएजी) आपली कोणतीही थेट भूमिका नाही; आपण एक गृहिणी असून केवळ रुग्णालय चालवितो, अशी टीना अंबानी यांनी शुक्रवारी साक्ष दिली. त्यावर विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी ‘पतीपेक्षा तुमची स्मरणशक्ती अधिक चांगली दिसते’ असे भाष्य केले. टूजी प्रकरणात गुरुवारी याच न्यायालयात अनिल अंबानी यांनी प्रत्येक बैठकांचा तपशील तसेच कंपन्यांची नावेही आठवत नसल्याची साक्ष नोंदविली होती.
टूजी प्रकरणात अंबानी दाम्पत्याच्या प्रत्यक्ष साक्षीबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने आग्रह धरला होता. त्यानुसार अनिल अंबानी यांची साक्ष गुरुवारी झाली. शुक्रवारी या प्रकरणात टीना यांचीही उलट तपासणी घेण्यात आली. पटियाला हाऊसमधील विशेष न्यायालयाचे  न्या. ओ. पी. सैनी यांच्यासमोर टीना यांनी आपण रिलायन्स समूहाच्या कोणत्याही उपकंपनीशी संलग्न नसल्याचे सांगितले. रिलायन्सबरोबर नाव जोडण्यात येणाऱ्या झेब्रा कन्सल्टंट तसेच स्वान कन्सल्टंटबद्दल मला काहीही माहीत नाही, असेही त्या वकील के. के. गोयल यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाल्या.
सुनावणीच्या शेवटी टीना यांनी न्यायाधीशांना ‘आपले समाजकार्य पाहण्यासाठी’ रुग्णालयात येण्याचे निमंत्रणही दिले. त्यावर ‘मी कसा येऊ शकतो’ असा प्रश्न त्यांनी केला. त्यावरही ‘विशेष पाहुणे म्हणून केवळ भेट देण्यासाठी या’ असे टीना यांनी सांगितले. न्यायाधीशांनी तेव्हा ‘या खटल्यानंतर’ असे त्यांना उत्तर दिले.