नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचं (एनएसई) काम सेवा प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ठप्प झालं आहे. ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’ला सेवा प्रदान करणाऱ्या दोन्ही दूरसंचार कंपन्यांच्या यंत्रणेत बिघाड झाल्यानं त्याचा परिणाम नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या प्रणालीवर झाला आहे. त्यामुळे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवा प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं एनएसईने ट्विट करून म्हटलं आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचं (एनएसई) कामकाज सुरू असताना स्पॉट निफ्टी किंमत आणि बँक इंडेक्स अपडेट होणं अचानक बंद झालं. त्यानंतर ११ वाजून ४० मिनिटांनी कामकाज बंद करण्यात आलं. यासंदर्भात एनएसईनं ट्विट करून माहिती दिली आहे.

“सुनिश्चित कामासाठी एनएसई दोन सेवा प्रदात्यांकडून सेवा घेते. मात्र, दोन्ही दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या प्रणालीमध्ये काही समस्या निर्माण झाल्याची माहिती आम्हाला दोन्ही दूरसंचार सेवा प्रदात्यांकडून मिळाली आहे. ज्याचा परिणाम एनएसईच्या प्रणालीवरही झाला आहे, असं एनएसईनं म्हटलं आहे.

“लवकरात लवकर सेवा प्रणाली पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. या सर्व परिस्थितीत ११ वाजून ४० मिनिटांनी सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत आणि प्रणाली पूर्ववत होताच पुन्हा सुरू करण्यात येईल,” असं एनएसईने स्पष्ट केलं आहे.