वैयक्तिक बचतकर्ते आपली बचत ही म्युच्युअल फंडामध्ये आणि विम्याकडे वळवत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने अहवालात म्हटले आहे. गैरकंपनी गटातील गुंतवणूकदार आणि कर्जदारांचा कल अभ्यासणारा हा त्रमासिक अहवाल नुकताच रिझव्‍‌र्ह बँकेने प्रसिद्ध केला.

भारतीय गुंतवणूकदारांचा दूरगामी कल बँकेच्या ठेवी असल्या तरी नजीकच्या काळात या वर्तनात बदल घडल्याचे निदर्शनास आले.

कर्ज रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी रोकड फंडांना रोकड सुलभतेच्या प्रश्नाने भेडसावले होते. यापासून धडा घेत फंडांनी गुंतवणुकीत केंद्र सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करून काही अंशी यावर मात करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

मोठी मालमत्ता बाळगणाऱ्या फंडांनी अर्थव्यवस्था कठीण काळातून मार्गक्रमण करत असताना रोकड सुलभतेचा प्रश्न भेडसावू नये म्हणून विशेषत: गुंतवणुकीस कायम खुल्या असलेल्या फंडांनी फंड मालमत्तेत वाढ होत असताना गुंतवणुकीत सरकारी रोख्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे, असा सल्ला रिझव्‍‌र्ह बँकेने कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांबाबत घडलेल्या घटनांवर भाष्य करताना निधी व्यवस्थापकांना दिला आहे.

गुंतवणुकीस कायम खुल्या असणाऱ्या रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांमध्ये संस्थात्मक गुंतवणूकदार आणि उच्च धनसंपदा बाळगणारे गुंतवणूक असतात. हे गुंतवणूकदार पैशांबाबत अतिसंवेदनशील असल्याने एखादी चूक या गुंतवणूकदारांना पैसे काढून घेण्यास प्रवृत्त करते.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालानुसार ताणतणावाच्या काळात अशा पैसे काढण्याच्या धोरणामुळे ज्यांना पैसे काढायचे नाहीत अशांवर दबाव येऊ न संतुलन बिघडते. यासाठी निधी व्यवस्थापकांनी काळजीपूर्वक जोखीम स्वीकारणे गरजेचे आहे, असे सांगितले जाते.