अनेक नवउद्यमी कल्पना बाजारपेठीय गरजांच्या विपरीत
केशव मुरुगेश – डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे समूह मुख्याधिकारी आणि नासकॉम बीपीएम कौन्सिलचे अध्यक्ष.

पंतप्रधानांच्या खास योजनांपैकी एक ‘उद्यमारंभी भारत’ योजना असल्याने सरकारकडून भरपूर प्रोत्साहन; अर्थपाठबळासाठी भारतीय बाजारातून ८ अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक साहसी भांडवलाची उभारणी आणि ई-व्यापार क्षेत्रातील तेजीमुळे अनेक धीट आणि उत्साहवर्धक कल्पना घेऊन पुढे आलेले नवउद्यमी असे एकंदर कमाईचे चित्र असताना, देशातील अनेक स्टार्टअप्सच्या सद्य:स्थितीचे वर्णन हुकलेल्या संधी असेच करता येईल. भारतातील तसेच सिलिकॉन व्हॅलीमधील नव उद्यमारंभी कंपन्यांच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करणारे डब्ल्यूएनएस ग्लोबल सíव्हसेसचे समूह मुख्याधिकारी आणि नासकॉम बीपीएम कौन्सिलचे अध्यक्ष केशव मुरुगेश यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना, सध्या प्रत्येक १० उद्यमारंभी (स्टार्टअप) कंपन्यांपैकी आठ किंवा नऊ अयशस्वी ठरत असल्याचे निरीक्षण नोंदविले.
अत्यंत परस्परविरोधी चित्र सध्या या क्षेत्रात आहे. भरपूर निधी उभारल्याच्या आणि नवनव्या कंपन्या अधिग्रहित केल्या गेल्याचे चित्र एकीकडे आहे तसेच निधीच्या कमतरतेमुळे उद्योग बंद झाल्याचीही उदाहरणे आहेत. विशेषत: २०१४ च्या तुलनेत सरलेल्या २०१५ सालात साहसी भांडवली निधीच्या उभारणीत ५० टक्क्यांनी वाढ झाली असताना असे आढळून येत आहे. त्यामुळे पुढची फ्लिपकार्ट किंवा स्नॅॅपडील निर्माण करायची, तर उद्योजकांना आणि ‘साहसी भांडवलदारां’नाही भरपूर कष्ट घ्यावे लागतील, असे मत मुरुगेश यांनी व्यक्त केले.

*  उद्यमारंभी कंपन्या अयशस्वी होण्याची कारणे काय?
– सर्वात पहिले कारण असे की, त्यांच्या उत्पादनाला असलेला बाजारपेठेमधील गरजेचा अभाव. कोणी तरी निर्माण केलेल्या सेवा, उत्पादनाने ग्राहकाची कोणतीही गरज पूर्ण केली नाही. दुसऱ्या बाजूने म्हणायचे तर, आपल्या सेवा-उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण करण्याचे दुहेरी आव्हान त्यांच्यापुढे होते. हे नवउद्यमी त्यांना आवडलेल्या अभिनव कल्पनेवर निर्धाराने काम करीत राहतात आणि अशी आशा करतात की ते त्या कल्पनेची किंवा उत्पादनाची गरज ग्राहकांना केव्हा तरी ते पटवून देऊ शकतील. दुर्दैवाने हे गणित जमत नाही, आणि शेवटी त्यांनी ओतलेला पसा अपरिहार्यपणे संपुष्टात येतो. पुरेशा निधीचा अभाव हे अयशस्वितेचे सामान्यपणे दिसून येणारे महत्त्वाचे कारण आहेच. प्रत्यक्षात येथे प्रसंगी फार जास्त निधी मिळणे हे सुद्धा काळजीचे कारण बनले आहे.

* अपयशाचे प्रमाण निश्चितच मोठे आहे, या संदर्भात आशादायी बदल नाहीच काय?
– अपयशाचे विश्लेषण करण्याची सिलिकॉन व्हॅलीमधील संस्कृती आता आपल्या समाजात हळूहळू रुजू लागली आहे. मुळात तेथे कामाचा अनुभव असलेले लोक मायदेशात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी परतू लागली आहेत. अपयशाचे त्रयस्थ भूमिकेमधून विश्लेषण खूपच आवश्यक आहे. देशातील उद्यमारंभी क्षेत्राच्या परिपक्वतेचे हे लक्षण स्वागतार्ह आणि आश्वासक नक्कीच आहे.
नवीन कल्पना अजमावण्यासाठी, निधीसाठी चाचपणी करण्यासाठी आणि एखादे उत्पादन सादर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे आणि भारतासारखी दुसरी पोषक बाजारपेठ अन्यत्र नसेल. पण यशासाठी काटेकोर योजना, तांत्रिकनिपुणता आणि बाजारपेठेचे ज्ञान यांचे संतुलन असलेल्या उत्साही सवंगडय़ांचा चमू कामाला जुंपला मात्र पाहिजे. असा संघ नसेल तर जाणीवपूर्वक बनवावा लागेल. डब्ल्यूएनएसमध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘विनक्युबेट’ नावाची खास उद्योजकता स्पर्धा घेत असतो. हा प्रयत्न आणि त्याचे परिणाम खूप चांगले दिसून आले आहेत.

* पंतप्रधानांच्या स्वप्नातील ‘उद्यमारंभी भारता’चे भविष्यातील चित्र कसे रंगवाल?
– आजच्या घडीला तंत्रज्ञान क्षेत्रातील ४,२०० हून अधिक उद्यमारंभी कंपन्या कार्यरत आहेत. एखाद्या देशाच्या उद्यमारंभी क्षेत्रातील प्रवासामध्ये अपयशी कंपन्या हे महत्त्वाचे मलाचे दगड असतातच. त्यामुळेच भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल दिसत आहे. नासकॉम-झिनोव्ह यांच्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत भारतामध्ये ११.५०० तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्यमारंभी कंपन्या असतील. गेल्या काही वर्षांतील प्रगती पाहता ही संख्या माफक आहे, पण वास्तविक म्हणायला हवी.

२०२० पर्यंत ११.५०० तंत्रज्ञान उद्यमारंभी कंपन्या
वर्ष २०१५ मध्ये भारतात स्थापन झालेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील ३८८ उद्यमारंभी कंपन्यांपकी २१ कंपन्यांना निधी मिळाला. ४३५ किरकोळ विक्री क्षेत्रातील उद्यमारंभी कंपन्यांपकी १५ कंपन्यांना निधी मिळाला आणि १९२ वित्तीय सेवा तंत्रज्ञान आणणाऱ्या उद्यमारंभी कंपन्यांपकी आठ कंपन्यांना निधी मिळाला.