सहकार क्षेत्रातील एसव्हीसी बँकेच्या संचालक मंडळाचे उदयकुमार पी. गुरकर यांची बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून तर विनोद जी. येन्नेमाडी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे अलीकडेच जाहीर केले. आजवर बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत असलेले सुरेश हेम्माडी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या पदावरून पायउतार झाल्याने या नियुक्त्यांबाबत निर्णय घेण्यात आला. उदयकुमार गुरकर हे २००८ सालापासून एसव्हीसी बँकेशी संलग्न आहेत. सनदी लेखापाल असलेले गुरकर हे इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य (एसीएस) आहेत. विनोद येन्नेमाडी हेही ‘एसीए’ (इंग्लंड व वॉलेस) असून, या आधी त्यांनी एचडीएफसी बँकेचे कार्यकारी संचालकपद भूषविले आहे.