कार्तिक रमण

पुढील १५ वर्षांत स्वत:चा व्यवसाय सुस्थापित करावयाचा आहे; मुलाचे उमद्या संस्थेतून उच्च शिक्षण पूर्ण करायचे आहे अथवा निवृत्तीपश्चात सुखासीन जीवन या सर्वासाठी मोठा पैसा हवा. कुटुंबाच्या भवितव्यासाठी पाहिलेल्या या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मोजावी लागणारी किंमत मोठीच आहे.

हे प्रत्येक स्वप्न पुरे करताना पुरेसा पैसा गाठीशी असेल यासाठी आर्थिक नियोजन मग आवश्यकच ठरते. पण विजयी रेषा पार करण्यासाठी पुरेसे धन मिळवून देणारे गुंतवणुकीचे नेमके साधन काय असावे? युनिटसंलग्न विमा योजना (युलिप) हे प्रश्नाचे आदर्श उत्तर खरेच मानता येईल काय?

आयुर्विमा कंपन्यांकडून प्रस्तुत युलिप हे जीवन विम्याचे कवच आणि गुंतवणुकीवर दीघरेद्देशी वाढ असे दुहेरी लाभ मिळवून देतात. अर्थात आर्थिक नियोजनाचा पाया असलेल्या दोन मुख्य घटकांची पूर्तता होऊन, दीर्घावधीसाठी योजलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा एक आदर्श गुंतवणूक पर्याय ठरतो.

आर्थिक संरक्षण : जर कुटुंबाकडे जीवन विम्याच्या रूपात पुरेसे आर्थिक संरक्षण नसेल तर बऱ्याचदा सर्वोत्तम कामगिरी असलेल्या गुंतवणुकाही कूचकामी ठरतात असे आढळले आहे. दुर्दैवाने घरातील कर्ता अकस्मात निघून गेल्यास, त्याच्या पश्चात कुटुंबाची नियमित खर्चासाठी आणि मुलांच्या शिक्षण – उच्च शिक्षणासाठीही सर्व मदार ही तुम्ही केलेल्या बचत आणि गुंतवणुकीवर असेल, हे लक्षात असू द्यावे. अर्थात अशा दुर्दैवी प्रसंगासाठी आधीपासून तयारी करून ठेवणारे खूप थोडके असतात, आपल्या पश्चात कुटुंबाला पुरेल इतकी बचत करून ठेवणारेही थोडकेच. त्यामुळे अशा परिस्थितीत जीवन विम्याचे कवचच आवश्यक आर्थिक संरक्षण पुरविते. काही युलिप योजना अशा आहेत, ज्यात मुलांच्या भविष्याच्या संरक्षणाचीही तरतूद आहे. अशा योजनेत जीवन विम्याचे कवच अव्याहत सुरू असते आणि मुदतपूर्ती रक्कमही मिळविता येते, परंतु मुलांच्या शिक्षणासाठी जेव्हा पैशाची गरज पडते, तेव्हा त्याचीही पूर्तता केली जाते.

भांडवली वृद्धी : समभाग गुंतवणूक (इक्विटी) ही दीर्घ कालावधीत साधारण ८ ते १० वर्षांमध्ये उच्च परतावा देते असे सिद्ध झाले आहे. तथापि व्यक्तिगत गुंतवणूकदाराला अशी गुंतवणूक करण्याइतकी अभ्यास, समज आणि वेळ असेलच असे नाही. अशा समयी युलिप हे वेगवेगळ्या बाजारस्थितीत समभागात गुंतवणुकीसाठी मदतकारक ठरते आणि जोखीम संतुलन म्हणून रोख्यांमध्ये (डेट) गुंतवणूकही यातून केली जाते.

व्यक्तिगत गुंतवणूकदाराच्या जोखीम सोसण्याच्या क्षमतेनुरूप, तो अथवा ती युलिपमधून गुंतवणुकीचा – समभाग आणि रोखे गुंतवणुकीचे प्रमाण कमी जास्त राखणाऱ्या फंडाचा पर्याय निवडू शकतो. अर्थात मुलांचे शिक्षण अथवा निवृत्तीपश्चात जीवनाची तरतूद ही उद्दिष्टे लांबपल्लय़ाची असण्याबरोबरच, मोठय़ा पुंजीची गरज लागणारी असल्याने युलिपकडून होणारे गुंतवणूक व्यवस्थापन उपयुक्त ठरेल.

गुंतवणूक प्रवासात लवचिकता: लवचिकता हे युलिपसारख्या योजनांचे खास वैशिष्टय़ आहे. मुदत कालावधीत पसंतीच्या फंड पर्यायाच्या निवडीचे स्वातंत्र्य असण्याबरोबरच, जेव्हा वाटेल तेव्हा एका फंडातून दुसऱ्या फंडात पैसा फिरविण्याची मुभाही येथे आहे. याची उपयुक्तता खूपच मोठी आहे. कारण कामकरी जीवनात व्यक्तीचे उत्पन्न/वेतनमान वाढत असते, त्यातून तिला प्रसंगी काहीशी जोखीम घेण्याची मुभा मिळते, जेणे करून दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळविता येऊ  शकतो. त्यामुळे युलिप योजनेच्या ठरावीक मुदतीत काही काळाकरिता समभाग गुंतवणुकीची मात्रा असलेल्या फंडांमध्ये अधिक पैसा वळविण्याचा विचार केला जाऊ शकतो. अशा नियत आणि निरंतर फंड बदलासाठी युलिप कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही, हे विशेषच. जेव्हा युलिप मुदतपूर्तीच्या समीप येते, तेव्हा या गुंतवणुकीवर मिळविलेला लाभ सुरक्षित राखावा अशी तुमची स्वाभाविक इच्छा असते, तेव्हा हा पैसा कमी जोखीम असलेल्या अन्य फंड पर्यायांमध्ये सहज स्थानांतरित करता येईल.

युलिपच्या या लवचिकतेच्या गुणामुळे तुमच्या बचतीत आणखी वाढीलाही मदत होते. जेव्हा बोनस, वेतनश्रेणीत मोठी वाढ, थकबाकी अथवा रिफंड या रूपात तुमच्याकडे मोठी रक्कम येते तेव्हा युलिपच्या टॉप-अप सुविधेमुळे ती रक्कमही गुंतविता येते. युलिपच्या प्रारंभिक कालावधीत अशी एकरकमी मोठी गुंतवणूक चक्रवाढ पद्धतीने दीर्घावधीत मोठी लाभदायी निश्चितच ठरते.

करबचतीचे लाभ : ही गुंतवणूक करबचतीला उपकारक आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये युलिपचे हप्ते म्हणून वार्षिक कमाल दीड लाख रुपयांची रक्कम ही पूर्णपणे करबचतीसाठी फायद्याची ठरते. शिवाय मुदतपूर्ती समयी मिळालेली रक्कमही कलम १० (१०)डी नुसार करमुक्त हाती पडते, जर वार्षिक हप्त्याच्या किमान १० पट अथवा अधिक ही रक्कम असेल तर. आणखी एक महत्त्वाचा कर लाभ आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात एका फंडातून गुंतवणूक काढून ती दुसऱ्या फंडात स्थानांतरित (स्विचिंग) करायचे झाल्यास, १० टक्के भांडवली लाभ कर लागू पडतो, जरी ही गुंतवणूक एक वर्षांपेक्षा अधिक काळ असली, तरी युलिपमध्ये मात्र असे स्विचिंग पूर्णपणे करमुक्त आहे.

दीर्घावधीच्या गुंतवणुकीचे फलित :  बचतीचे महत्त्व कळते, परंतु वळत नाही, अशांसाठी नियमित बचतीची शिस्त भिनविण्यासाठी युलिप फायद्याचे ठरते. आर्थिक संरक्षण आणि बचत केलेल्या पैशाची वृद्धी असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याच्या युलिपच्या आकर्षक गुणामुळे हे शक्य होते. म्युच्युअल फंडांप्रमाणे युलिपमधून मुदतपूर्व निष्कासन शक्य नाही. लवकरात लवकर पैसे काढायचे झाले तर ते पॉलिसीची पाच वर्षे पूर्ण झाल्यावर शक्य असते. या वैशिष्टय़ामुळे युलिपच्या निधी व्यवस्थापकांना दीर्घावधीत चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करता येते आणि पर्यायाने तुमच्या बचतीवरही चांगला परतावा दिला जातो. युलिपद्वारे लॉयल्टी बोनसचे लाभही मिळतात. विमा कवचाच्या प्रमाणात ही रक्कम ठरते आणि पॉलिसीची ठरावीक मुदत समजा १० वर्षे पूर्ण केल्यावर तुम्हाला मिळविता येते. त्या पश्चात दर पाच वर्षांनी लॉयल्टी बोनस मिळून तुमच्या अंतिम मुदतपूर्ती रकमेत भर पडत जाते.

एकंदरीत अनेकांगी फायदे पाहता, लांबपल्लय़ाच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने युलिप हा तुमच्या गुंतवणुकीला आवश्यक मजबूत कंगोरा प्रदान करतो.

(लेखक आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे मुख्य विपणन अधिकारी आणि उत्पादन प्रमुख)