युनायटेड स्पिरिट्सचा ताळेबंद स्वच्छ व लेखापरीक्षित असून त्याला संचालक मंडळ, भागधारक यांच्यासह सर्व नियामक यंत्रणांनीही मंजुरी दिली आहे; तेव्हा त्यात काही काळेबेरे असण्याची चिंता अनाठायी आहे, अशी निर्विकार प्रतिक्रिया या कंपनीचे अ-कार्यकारी अध्यक्ष विजय मल्या यांनी गुरुवारी दिली.
मल्या यांच्या युनायटेड स्पिरिट्सवर ब्रिटनच्या दिआज्जिओने ताबा घेतल्यानंतर केलेल्या अंतर्गत चौकशीत खरेदी व्यवहारात गैरव्यवहाराचा आरोप करतानाच, अवैधरीत्या मल्या यांच्या अन्य कंपन्यांना कर्ज दिल्याचा ठपका ठेवला आहे. याबाबत भांडवली बाजारांनेही विचारणा केल्यानंतर कंपनी व्यवहार खाते व प्राप्तिकर विभागाचीही त्याकडे वक्रदृष्टी वळली आहे.
या बद्दल मल्या म्हणाले की, संबंधित कालावधीतील युनायटेड स्पिरिट्सच्या ताळेबंदाचे चोख लेखापरीक्षण झाले आहे. शिवाय कंपनीचे संचालक मंडळ, भागधारक यांनीही त्याला मान्यता दिली आहे. तसेच विविध नियामक यंत्रणांमार्फतही ते पारित केले गेले आहेत. तेव्हा आता काळजीचे कारण नाही. दिआज्जिओने करार करताना त्यापूर्वीच्या सहा महिन्यांतील सर्व कर्ज प्रकरणे नजरेखालून घातली आहेत, असेही मल्या यांनी सांगितले. २०१४ मध्ये कंपनीच्या व्यवस्थापन ताब्यात घेतल्यानंतर दिआज्जिओने २०१० ते २०१४ दरम्यानच्या ताळेबंदांचे पीडब्ल्यूसीमार्फत केलेल्या तपासात युनायटेड स्पिरिट्सने मल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्ससह यूबी समूहातील काही कंपन्यांना गैररीत्या कर्ज दिल्याचे आढळून आले. एकूण कर्ज रक्कम १,३३० कोटी रुपये असल्याचे समजते. शेअर बाजारचीही याबाबत स्पष्टीकरणाची मागणी आहे.