उत्पादन शुल्कातील कपातीचा वाढीव लाभ देशातील वाहन उद्योगावर अद्यापही मर्जी राखून आहे. जुलैमध्ये पुन्हा वाहन कंपन्यांनी देशांतर्गत वाहन विक्रीतील वाढ कायम राखली आहे. मारुतीसह होन्डा, फोर्ड यांनी यंदा विक्रीतील वाढ राखली आहे. तर ‘ाुंदाईसह टाटा मोटर्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रला जुलै २०१४ मध्ये वाहन विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले आहे.
देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकीने २१.७ टक्के वाढ राखत जुलैमध्ये एकूण  एक लाख विक्रीचा टप्पा पुन्हा एकदा गाठला आहे. कंपनीने वर्षभरापूर्वीच्या ८३,२९९ तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये १,०१,३८० वाहने विकली आहेत. कंपनीने गुरुवारीच वाढीव नफ्यातील वित्तीय निष्कर्ष जारी केले होते. कंपनीने देशांतर्गत वाहन विक्रीतही वर्षभराच्या तुलनेत १९.९ टक्के वाढ राखली आहे. जुलैमध्ये कंपनीच्या ९०,०९३ वाहनांची विक्री झाली. कंपनीने निर्यातीतील वाढही तब्बल ३८.४ टक्के नोंदविली आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची मुळची कोरियन कंपनी ‘ाुंदाईला एकूण विक्रीत यंदा काहीशा घसरणीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीने १.४२ टक्के घसरण राखत यंदा ४८,०१० विक्री केली आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत कंपनीने जुलै २०१३ च्या तुलनेत गेल्या महिन्यात अधिक, २९,२६० वाहनांची विक्री केली आहे. निर्यातीत आघाडीवर असलेल्या या कंपनीने या क्षेत्रातही यंदा १७.५४ टक्के घसरण नोंदविली आहे.
टाटा मोटर्स व महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रच्या वाहन विक्रीत यंदाही घट नोंदविली गेली आहे. टाटा मोटर्सने २३.४४ टक्के तर महिंद्रने ४.१२ टक्के वाहन विक्रीतील घसरण राखली आहे. टाटा मोटर्सने जुलैमध्ये ५० हजाराच्या आत विक्रीचा आकडा गाठला आहे. तर महिंद्र गेल्या महिन्यात  ३५ हजारापर्यंत पोहोचली आहे.
टोयोटा किर्लोस्करच्या वाहन विक्रीत गेल्या महिन्यात किरकोळ, ४.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपीने १३,८४७ वाहने विकली आहेत. तिच्या देशांतर्गत वाहन विक्रीत मात्र ३.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. जपानच्याच होन्डाने विक्रीतील तब्बल ३९.९७ टक्के वाढ राखली आहे. कंपनीची स्थानिक बाजारपेठेत तब्बल १५,७०९ वाहने विकले गेली. कंपनीने बहुपयोगी वाहन क्षेत्रात प्रथमच उतरविलेल्या मोबिलिओची गेल्या महिन्यात ३,३६५ विक्री झाली.
फोर्ड इंडियाच्या वाहन विक्रीत २४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीने जुलै २०१४ मध्ये १५,२८२ वाहने विकली. कंपनीची देशांतर्गत विक्री मात्र ३.४९ टक्क्यांनी यंदा रोडावली. कंपनीची निर्यात तब्बल ७१.९९ टक्क्यांनी उंचावली आहे.
शेव्‍‌र्हले नाममुद्रा असलेल्या जनरल मोटर्सच्या वाहन विक्रीत यंदात तब्बल २७ टक्के घसरण झाली. जुलै २०१३ मधील ६,५०३ च्या तुलनेत कंपनीने गेल्या महिन्यात ४,७२६ वाहने विकली.