मारुती, टाटा, महिंद्रसाठी मागणी रोडावली

दसरा, दिवाळीसारखा सणांचा महिना सरताच देशातील वाहन क्षेत्रही पुन्हा विक्री घसरणीकडे झुकले आहे. गेल्या महिन्यात, नोव्हेंबरमध्ये मारुती, टाटा मोटर्स, महिंद्रसारख्या कंपन्यांना वाहन विक्री घसरणीला सामोरे जावे लागले आहे. ऑक्टोबरमध्ये वाहन विक्रीत वाढ झाली होती.

क्षेत्रात सर्वाधिक वाहन विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत नोव्हेंबरमध्ये १.९ टक्के घसरणीसह १,५०,६३० वाहन विक्री नोंदली गेली आहे. तर टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत वार्षिक तुलनेत २५.३२ टक्के घसरण होत ती यंदा ४१,१२४ झाली आहे. महिंद्र अँड महिंद्रची वाहन विक्री ९ टक्क्य़ांनी खाली येत ४१,२३५ पर्यंत स्थिरावली आहे. दुचाकी गटातील आघाडीच्या बजाज ऑटोच्या विक्रीत किरकोळ, ०.९ टक्के घसरण झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण ४.०३ लाख वाहन विकली आहेत. तर हीरो मोटोकॉर्पची विक्री १५.३१ टक्क्य़ांनी आपटत ५.१६ लाखांवर येऊन ठेपली आहे.

नोव्हेंबरमधील घसरत्या वाहन विक्रीमुळे या क्षेत्रातील मारुतीसह आघाडीच्या कंपन्यांचे समभागही घसरले. भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग आठवडय़ाच्या पहिल्याच सत्तार २.५९ टक्क्य़ापर्यंत घसरले. त्यात मारुती सुझुकी अव्वल राहिला. १.७७ टक्के घसरणीसह कंपनी समभाग ७,१२१.२० वर स्थिरावला. तर टाटा मोटर्स ०.२८ टक्के घसरणीसह १६१ वर बंद झाला. महिंद्र अँड महिंद्रच्या समभाग मूल्यात सोमवारी १.१५ टक्के घसरण होत मूल्य ५२३.९५ पर्यंत थांबले.