जानेवारीच्या प्रवासी वाहन विक्रीत १४ टक्के वाढ

निश्चलनीकरणाचा कालावधी संपताच देशातील प्रवासी वाहन विक्री पूर्वपदावर आली आहे. जानेवारी २०१७ मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री १४ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरापूर्वीच्या २,३१,९१७ वाहनांच्या तुलनेत यंदा त्यांची २,६५,३२० पर्यंत विक्री झाली आहे.

दुचाकी वाहन क्षेत्राचा प्रवास मात्र अद्यापही नकारात्मक असून विविध वाहने मिळून एकूण वाहन विक्री ४.७१ टक्क्यांनी घसरली आहे.

सरलेल्या २०१६ची अखेर करताना डिसेंबरमध्ये एकूण वाहन विक्री तब्बल १८.६६ टक्क्यांनी खाली येत या क्षेत्राने गेल्या १६ वर्षांचा तळ नोंदविला होता. निश्चलनीकरणाच्या अखेरच्या टप्प्यात एकूण वाहनांची १२,२१,९२९ विक्री झाली होती. तथापि जानेवारीमध्ये प्रवासी, दुचाकी, व्यापारी आदी १६,२०,०४५ वाहने विकली गेली आहेत. वर्षभरापूर्वीच्या १७ लाख वाहनांच्या तुलनेत त्यात यंदा ४.७१ टक्के घसरण झाली आहे.

प्रवासी वाहन गटात कार विक्री जानेवारी २०१६ मधील १,६८,३०३ वाहन विक्रीपेक्षा यंदा १०.८३ टक्क्यांनी वाढून ती १,८६,५२३ झाली आहे. एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७ दरम्यान प्रवासी वाहन विक्री ९.१७ टक्क्यांनी वाढली आहे.

विक्रीबाबत अनेक वाहन गटांमध्ये यंदा लक्षणीय सुधार दिसून येत असल्याचे वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना ‘सिआम’चे महासंचालक विष्णू माथूर यांनी म्हटले आहे. हा उद्योग निश्चलनीकरणाच्या फेऱ्यातून आता सुटला आहे, हेच यंदाच्या वाहन विक्रीतील वाढीच्या आकडय़ावरून दिसून येते, असेही ते म्हणाले. यंदा प्रवासी वाहन विक्रीला विशेषत: ग्रामीण भागातून अधिक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत जवळपास दुहेरी अंकातील वाहन विक्री वाढ पाहता एकूण वित्तवर्षांतही दुहेरी अंकातील वाहनवृद्धी राखता येईल, असा विश्वास या उद्योगामार्फत व्यक्त करण्यात आला आहे.

दुचाकी विक्री अद्याप नकारार्थीच

दुचाकी वाहन क्षेत्राचा प्रवास मात्र अद्यापही नकारात्मक असून जानेवारी म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यांत या वाहन वर्गवारीतील एकूण विक्री ४.७१ टक्क्यांनी घसरली आहे. या क्षेत्रावर निश्चलनीकरणाचा विपरित परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तर दुचाकी विक्रीतही वाढ लवकरच दिसेल, असा विश्वास ‘सिआम’चे माथूर यांनी व्यक्त केला. डिसेंबर २०१६ मध्ये मोटरसायकल विक्री २२ टक्क्यांनी घसरली होती. तर यंदा ती ६ टक्क्यांनी घसरली आहे. जानेवारीत ८,१९,३८६ मोटारसायकलची विक्री झाली. तर एकूण दुचाकी वाहन विक्री ७.३९ टक्क्यांनी रोडावत १२,६२,१४१ झाली आहे. एपिल ते जानेवारीत या क्षेत्राची वाटचाल ८ टक्के वाढ नोंदविणारी ठरली. स्कूटर गटातील वाहने १४.५ टक्क्यांनी घसरून ३,७३,३८२ वर आली आहेत.