ठाणे आणि कल्याण या शहरांमधील मोबाईल ग्राहकांसाठी व्होडाफोन कंपनीने फोरजी सेवा सुरू केली असून या सेवेचा शुभारंभ गुरूवारी ठाण्यात झाला. फोरजीच्या माध्यमातून मोबाईल ग्राहकांना आता अधिक वेगाने इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार असून या सेवेसाठी २६ रुपयांपासून ते ३२९७ रुपयांपर्यंतच्या डेटा पॅकच्या आकर्षक योजना कंपनीने आखल्या आहेत. फोरजीच्या एका मोबाईल वाय-फाय सेवेच्या माध्यमातून एकाच वेळी दहा उपकरणांवर इंटरनेट सेवा वापरता येऊ शकते.
ठाणे येथील टिपटॉप प्लाझामध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात व्होडाफोन कंपनीचे मुंबई परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख इशमीत सिंग आणि ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत फोरजी सेवेचा शुभांरभ करण्यात आला. भारतातील दूर संचार सेवा पुरवठादार असलेल्या व्होडाफोन कंपनीने गेल्या महिन्यापासून मुंबई शहरात फोरजीची सेवा पुरविण्यास सुरूवात केली आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे आणि कल्याण भागातील मोबाईल ग्राहकांनाही या सेवेचा फायदा घेता यावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून आता ग्राहकांना अधिक वेगाने इंटरनेट सेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती इशमीत सिंग यांनी दिली.
फोरजी रेड ग्राहकांना एका महिन्यासाठी शंभर टक्के अतिरिक्त डेटा तर पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांसाठी काही निवडक किंमतीवर एक जीबीपेक्षा अधिकचा डेटापॅक देण्यात येणार आहे. तसेच या सेवेचे एक भाग म्हणून ग्राहकांना व्होडाफोन प्लेअरवर टिव्ही, चित्रपट आणि संगीताचा तीन महिन्यांसाठी लाभ घेता येणार आहे. या सेवेसाठी २६ रुपयात ७५ एमबीच्या डेटा पॅकपासून ३२९७ रुपयात २० जीबीच्या डेटा पॅकपर्यंतच्या योजना आहेत, असेही त्यांनी सांगितले. सर्व व्होडाफोन स्टोअरमध्ये आणि निवडक रिटेल दुकानामध्ये ग्राहकांना तातडीने सीमकार्ड बदलून मिळेल. तसेच पोस्टपेड फोरजी सिमकरीता ग्राहकांनी मागणी नोंदवली तर लगेचच दुसऱ्या दिवशी सीमकार्ड संबंधित ग्राहकांच्या घरपोच करण्यात येईल. याशिवाय, सीम किंवा मोबाईल फोरजी सेवेसाठी सक्षम आहे का नाही, याची माहिती ग्राहकांना १९९ क्रमांकावर एसएमस पाठविल्यानंतर मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोफत अद्ययावतेची सुविधा
थ्रीजीच्या ग्राहकांना फोरजी सेवेसाठी मोफत अपग्रेडेशनची सुविधा देण्यात असून ग्राहकाना त्यांचे सिमकार्ड फोनवर केलेल्या नोंदणीनंतरही पाठविण्यात येणार आहेत. या सेवेमुळे ग्राहकांना व्हिडीओ, संगीत अधिक सुलभपणे डाऊनलोड वा अपलोड करता येईल. अ‍ॅप्सचा वापर अधिक सुलभपणे करता येईल. ग्राहकांना उत्तम दर्जाचे हाय डेफिनेशन व्हिडीओ, मोबाइल गेमिंग तसेच व्हिडीओ कॉलिंगचाही अनुभवही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येईल, असे इशमीत सिंग यांनी सांगितले.