चार कंपन्यांकडून एकूण ६.४८८ कोटी रुपये मंगळवारी सरकारकडे जमा

ध्वनिलहरी व परवाने शुल्क थकबाकी तसेच दंडापोटी भरावयाच्या एकूण रकमेपैकी काही रक्कम मंगळवारी वेगवेगळ्या दूरसंचार कंपन्यांनी दूरसंचार विभागाकडे जमा केली. पैकी व्होडाफोन आयडियाने तिसऱ्या टप्प्यात ३,०४३ कोटी रुपये भरले. तर भारती एअरटेलने १,९५० कोटी रुपये जमा केले.

थकीत ध्वनिलहरी व परवाना शुल्क व दंडासह १.४७ लाख कोटी रुपये विविध १५ कंपन्यांनी दूरसंचार विभागाकडे विनाविलंब जमा करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात दिला आहे. त्यानंतर व्होडाफोन आयडियाने एकाच आठवडय़ात दोन वेळा मिळून ३,५०० कोटी रुपये भरले आहेत. तर मंगळवारी आणखी ३,०४३ कोटी रुपये भरणाऱ्या व्होडाफोनकडे सरकारने एकूण ५३,००० कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी केली आहे.

भारती एअरटेलने मंगळवारी १,९५० कोटी रुपये भरले. थकबाकीपोटी एकूण ३५,००० कोटी रुपयांचे दायित्व असलेल्या भारती एअरटेलने यापूर्वी १८,००० कोटी रुपये भरले आहेत. कंपनीने गेल्या शनिवारी ८,००४ कोटी रुपये जमा केले होते.

रिलायन्स जिओने मंगळवारी १,०५३ कोटी रुपये भरले. एकूण १४,००० कोटी रुपयांचे दायित्व असलेल्या टाटा समूहातील टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसने मंगळवारी आणखी २,१९७ कोटी जमा केले.

दरम्यान, उर्वरित थकीत रक्कम भरण्याबाबत विचारणा करणारे नवे पत्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून लवकरच दूरसंचार कंपन्यांना पाठविले जाणार असल्याचे समजते. तडजोडीसह थकबाकीची पूर्ण रक्कम भरण्याची तयारी दर्शविणाऱ्या कंपन्यांनाही याबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे. दूरसंचार कंपन्यांकडील माहिती आणि दूरसंचार विभागाचा दावा यामध्ये थकीत रकमेबाबत तफावत आहे. दूरसंचार विभागाने कंपन्यांना त्यांच्या व्यवस्थापैकीय संचालकांची नावे त्यांच्या पत्त्यासह सादर करण्यास यापूर्वीच सांगितले आहे.