02 March 2021

News Flash

बाजार-साप्ताहिकी : अविरत पडझड

गटातील करदात्यांवर अधिभार लावून सरकारला केवळ २,७२४ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे,

संग्रहित छायाचित्र

सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

अर्थसंकल्पानंतरचा बाजार घसरणीचा हा चौथा आठवडा! गेल्या आठवडय़ात म्हटल्याप्रमाणे बाजाराचा तळ जवळ दिसतो आहे; पण त्याचा अचूक अंदाज लागणे मुष्कील! दर दिवशी बाजार वर येण्याचा प्रयत्न करतो; पण नंतर त्याचे अवसान गळते. परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा, वाहनविक्रीतील घट, तिमाही निकाल जाहीर करताना उद्योजकांनी भविष्याबाबत व्यक्त केलेली साशंकता, बडय़ा गुंतवणूकदारांतील निराशा अशी अनेक कारणे त्याला जबाबदार आहेत. आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ७६५, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) २८७ अंशांची लागोपाठ चौथी साप्ताहिक घट दाखवली.

उच्च उत्पन्न गटातील करदात्यांवर अधिभार लावून सरकारला केवळ २,७२४ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे, मात्र सरकारची ‘रॉबिनहूड’ प्रतिमा जपली जाणार आहे; पण त्याची किंमत बाजारातील घसरणीने सरकारला व सामान्य गुंतवणूकदारांना मोजावी लागत आहे. अर्थात उच्च पातळीवरील (निफ्टीचा पी/ई रेशो २९) समभागांना खाली येण्यास हे निमित्त झाले हेदेखील तितकेच खरे.

तरुणाईमधील लोकप्रिय कॅफे कॉफी डे (सीसीडी) च्या प्रवर्तकांच्या अचानक निधनाच्या बातमीने त्या कंपनीचे समभाग चार दिवसांत पन्नास टक्क्यांनी खाली आले; पण त्या अनुषंगाने आरबीएल बँकेचे समभागदेखील खाली आले. गेल्या काही महिन्यांत झी उद्योग, इमामी, येस बँक अशी काही उदाहरणे सापडतील जेव्हा प्रवर्तक विविध क्षेत्रांत पदार्पण करण्यासाठी आपल्या यशस्वी उद्योगावर बाजी लावतो, त्याचे समभाग गहाण ठेवतो व कठीण समयी आपल्या भागधारकांचे नुकसान तर करतोच; पण त्याला कर्जे देणारी बँकही नुकसान सोसते. असे व्यवहार सामान्य गुंतवणूकदारांना अगोदर समजणे कठीणच. तरीसुद्धा साधारणत: एकाच व्यक्तीच्या आधिपत्याखाली चालणाऱ्या कंपन्यांमध्ये असा धोका असू शकतो. अशा कंपन्यांच्या वार्षिक अहवालात नमूद केलेल्या उपकंपन्यांचे जाळेदेखील मोठे असते. अर्थात टाटा, रिलायन्ससारख्या मोठय़ा उद्योगांतही अशा उपकंपन्या दिसू शकतात; पण या समूहांचे उद्योग व्यावसायिक व्यवस्थापकांमार्फत चालविले जातात व ते आज अनेक वर्षे कार्यरत आहेत.

आयसीआयसीआय बँकेच्या तिमाही नफ्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत भरघोस वाढ झाली व बुडीत कर्जाचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. अ‍ॅक्सिस व स्टेट बँकेच्या नफ्यातही भरघोस वाढ झाली; परंतु बुडीत कर्जामध्ये फारशी घट झाली नाही. बाजारात त्याचे पडसाद दिसले. सध्याच्या बाजारात हे तीनही समभाग दीर्घ मुदतीसाठी घेण्यासारखे आहेत.

जुलै महिन्याच्या वाहनविक्रीत अपेक्षेप्रमाणे मोठी घट दिसून आली. पायाभूत क्षेत्रातील वाढीचा दर गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ५.५ टक्यावरून २.२ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ातील पतधोरण बठकीत रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित पाव टक्क्यांपेक्षा मोठय़ा दरकपातीची अपेक्षा बाजाराला आहे. पुढील आठवडय़ात पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून परदेशी गुंतवणूकदारांच्या कर अधिभाराबाबत काही हस्तक्षेप होतो का आणि रिझव्‍‌र्ह बँकेकडून किती दरकपात होते याकडे बाजाराचे लक्ष राहील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 4:56 am

Web Title: weekly market recap weekly share market share market
Next Stories
1 बाजारातील पडझडीनंतर सरकारची कर-अधिभारावर पुनर्विचाराची तयारी
2 जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची सातव्या स्थानावर घसरण
3 तिमाहीत २१३ टन सोने आयात
Just Now!
X