सलग चौथ्या महिन्यात शून्यानजीक प्रवास कायम राखत घाऊक किमतींवर आधारित महागाई निर्देशांकाने फेब्रुवारी २०१५ मध्ये उणे २.०६ टक्के असा विक्रमी तळ गाठला. पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या एप्रिलच्या पतधोरणात त्यामुळे व्याजदर कपातीची उद्योगजगताची आशा पुन्हा एकदा उंचावली आहे.
गेल्या आठवडय़ात गुरुवारी जाहीर झालेल्या किरकोळ किंमतीवर आधारीत महागाई निर्देशांकाने फेब्रुवारीमध्ये वाढ (५.३७ टक्के) नोंदविली. तर याच महिन्यातील घाऊक महागाई दर मात्र उणे २.०६ टक्के असल्याचे सोमवारी जाहीर झाले. सलग चौथ्या महिन्यात हा दर शून्याच्या आसपास वा उणे स्थितीत आहे. मे २०१४ पासून सातत्याने कमी होत असलेल्या महागाई दराने नोव्हेंबरमध्ये शून्यवत, तर डिसेंबरमध्ये किरकोळ वाढ नोंदविली.  अन्नधान्यांसह इंधन तसेच निर्मिती वस्तूंच्या किमती कमी झाल्याने यंदाही महागाईत उतार आला आहे.
घाऊक किंमत निर्देशांक यापूर्वी जानेवारी (-०.३९%), डिसेंबर (०.११%) व नोव्हेंबर (०.००%) असा तिन्ही महिने शून्यानजीक वा उणे स्थितीत होता. तर वर्षभरापूर्वी फेब्रुवारी २०१४ मध्ये तो ५.०३ टक्के नोंदला गेला होता. यंदा अन्नधान्याच्या महागाईचा दर ७.७४ टक्के, निर्मिती वस्तूंचा  दर ०.३३ टक्के नोंदला गेला आहे. तर इंधन व ऊर्जा महागाई दर कमालीचा खाली, १४.७२ टक्के राखला गेला आहे. भाज्यांच्या किमतीही आधीच्या महिन्यातील १९.७४ टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये १५.५४ टक्के असा कमी झाला आहे.
‘इक्रा’च्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी मात्र एप्रिलमधील पतधोरणात व्याजदरात कपात होण्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. तर एकूण २०१५ वर्षांत अध्र्या टक्क्यापेक्षा अधिक व्याजदरकपात होईल, असे वाटत नाही, असेही त्या म्हणतात.
बिगर मोसमी पावसाने कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ‘डेलॉइट’ (इंडिया)चे वरिष्ठ संचालक अनिश चक्रवर्ती यांनी अन्नधान्यातील स्वस्ताई काही काळासाठी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अन्नधान्यांचे दर पुन्हा वाढताना दिसतील, असे ते म्हणाले.
उद्योग जगताने मात्र आता रिझव्‍‌र्ह बँकेमागे व्याजदरकपातीसाठी तगादा लावला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अन्नधान्यादी वस्तूंचे भाव वाढत असताना येथे त्यात स्वस्ताई दिसत असल्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरकपातीचे धोरण कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्या प्रमुख दरांमध्ये आणखी कपात करून अन्य व्यापारी बँकांनीही त्याचा लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचविण्याची गरज उद्योजकांच्या संघटनांनी मांडली आहे.
उद्योगजगताला हवी
व्याजदर कपात!
२०१५-१६ या नव्या आर्थिक वर्षांचे रिझव्‍‌र्ह बँकेचे पहिले पतधोरण येत्या ७ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी यापूर्वी पतधोरणाव्यतिरिक्त दोन वेळा प्रत्येकी पाव टक्क्याची दरकपात केली आहे. यानुसार जानेवारी व मार्चमध्ये तत्कालीन पतधोरणापूर्वीच ही दरकपात करण्यात आली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुन्हा एकदा व्याजदरकपात आवश्यक आहे, अशी गरज आता उद्योग जगत पुन्हा मांडत आहेत.