एप्रिलमध्ये अन्नधान्यांच्या किमती वरच्या टप्प्यावर

मागणीअभावी अन्य घटकांच्या किमतीत घट

अन्नधान्याच्या किमती वरच्या टप्प्यावर राहूनही इंधन तसेच निर्मित वस्तूंच्या मागणीअभावी किमती कमी झाल्याने एप्रिलमधील घाऊक महागाई दर ३ टक्क्यांच्या आसपास स्थिरावू शकला आहे.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित गेल्या महिन्यातील महागाईचा दर ३.०७ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वीच्या ३.६२ टक्के तसेच आधीच्या महिन्याच्या तुलनेत तो सावरला आहे.

घाऊक महागाई दर फेब्रुवारी २०१९ मध्ये ३ टक्क्यांच्या आत, २.९३ टक्के होता. गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या किमतीतील महागाई मार्चमधील ५.६८ टक्क्यांवरून ७.३७ टक्क्यांवर पोहोचली आहे. डिसेंबर २०१८ पासून सलग पाच महिने अन्नधान्याच्या किमतीत वाढ सुरूच असून ती आता शून्य टक्क्यापुढे पोहोचली आहे.

डिसेंबर २०१८ पासून भाज्यांच्या किमतीही वाढल्या असून त्या एप्रिल २०१९ मध्ये ४०.६५ टक्क्यांपर्यंत झेपावल्या आहेत. पाच महिन्यांपूर्वी त्या उणे स्थितीत होत्या. मार्चमध्ये त्या २८.१३ टक्क्यांपर्यंत होत्या.

अन्नधान्याच्या गटात बटाटे, कांदे तसेच फळांच्या दरांमध्ये घसरण नोंदली गेली आहे. तर ऊर्जा व इंधन गटातील वस्तूंच्या किमतीही काहीशा स्थिरावल्या आहेत. गेल्या महिन्यात डिझेल तसेच पेट्रोलच्या किमतीही काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती मात्र चढय़ा राहिल्या आहेत. निर्मित वस्तूंच्या किमतीही निम्म्याने कमी होत २ टक्क्यांच्या आत स्थिरावल्या आहेत.

सहा महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेला गेल्या महिन्यातील किरकोळ महागाई दर सोमवारीच स्पष्ट झाला. प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमतीतील वाढीमुळे नव्या वित्त वर्षांच्या सुरुवातीचा किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक ३ टक्क्यांनजीक पोहोचला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणासाठी निर्णायक ठरणारा हा दर आगामी व्याजदराबाबत काय भूमिका घेतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.