भारतात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४२,७९० रुपये तर प्रति किलो चांदीचा दर ४८,३७६ रुपये होता. एका आठवडयात प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १८०० रुपयांनी वाढला. सोन्याची ही दरवाढ अनेकांना अचंबित करणारी आहे. पण त्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत.

– यंदाच्या वर्षी जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावामध्ये ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे जागतिक विकासावर परिणाम होण्याची भिती गुंतवणूकदाराच्या मनात आहे. आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. त्यामुळे सोने खरेदी मोठया प्रमाणात वाढली आहे. कोरोना व्हायरसचा चीनच्या विकासावर परिणाम झाला असून, अन्य देशांच्या आर्थिक प्रगतीवरही मर्यादा येऊ शकतात असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने दिला आहे.

– डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरक्षित गुंतवणूकीला गुंतवणूकदारांचे पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलरची मागणी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात होणाऱ्या सोन्याची किंमत वाढली आहे. जीएसटीमुळेही या दरामध्ये आणखी वाढ होत आहे.

बुधवारी मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सरासरी ४५० रुपयांनी वाढ झाली. तर चांदीचा भावही किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला. गुरूवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये होता.