मुंबई : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडकडून गेल्या सलग तीन वर्षांतील तिसऱ्या आणि सर्वात मोठय़ा सुमारे १२,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बाय-बॅक) योजनेला बाजार नियंत्रक ‘सेबी’ने बुधवारी हिरवा कंदील दिला. यापूर्वी विप्रोने २०१६ सालात २,५०० कोटींची आणि २०१७ सालात ११,००० कोटींची पुनर्खरेदी करून आपल्या भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे.

अद्याप या समभाग पुनर्खरेदी योजनेचा तपशील निश्चित केला गेला नसला तरी यंदा प्रत्येकी ३२० रुपये किमतीला ही पुनर्खरेदी विप्रोकडून केली जाण्याचे विश्लेषकांचे कयास आहेत. म्हणजे समभागाच्या बुधवारच्या बीएसईवरील २७३ रुपये बंद भावाच्या तुलनेत १७ टक्के अधिमूल्य भागधारकांना मिळेल. तर गेल्या सहा महिन्यांतील समभागाच्या २४० रुपये या सरासरी किमतीच्या तुलनेत भागधारकांना ३३ टक्के अधिक मूल्य प्रदान केले जाईल.

कंपन्यांकडील राखीव गंगाजळीतून भागधारकांना लाभ देण्याचा समभाग पुनर्खरेदी हा लाभांशापेक्षा करकार्यक्षम पर्याय ठरला असून, गेल्या काही वर्षांत टीसीएस, कॉग्निझंट, एचसीएल टेक्नॉलॉजीज, माइंड ट्री, इन्फोसिस या विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून हा मार्ग समर्पकपणे वापरात आला आहे. विप्रोकडून गेल्या सलग तीन वर्षांत भागधारकांना या पद्धतीतून लाभ दिला गेला आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार, कोणत्याही कंपनीला समभाग पुनर्खरेदी ही १२ महिन्यांमध्ये एकदाच करता येते. विप्रोने यापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे या नव्या पुनर्खरेदीचा कंपनीचा मार्ग खुला झाला आहे.

भागधारकांना लाभाचे दान..

‘बाय-बॅक’ कालावधी              एप्रिल २०१६    सप्टेंबर २०१७         जून २०१९

आकारमान (रु. कोटी)            २,५००             ११,०००                       १२,०००

प्रति समभाग किंमत (रु.)      ६२५                  ३२०                             ३२०

अधिमूल्य %                           ४                    १९                                 ३३