मुंबई : भारतातील अग्रणी भांडवली बाजार अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई लिमिटेड) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी विक्रम लिमये यांची जागतिक भांडवली बाजारांचा महासंघ असलेल्या वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंजेस (डब्ल्यूईएफ)च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि महासंघाच्या संचालक मंडळावर निवड घोषित करण्यात आली आहे. अथेन्स, ग्रीस येथील महासंघाच्या ५८ व्या आमसभा आणि वार्षिक बैठकीत ही निवड बुधवारी जाहीर करण्यात आली.

जगभरातील ४५,००० सूचिबद्ध कंपन्या आणि त्यातील समभागांचे व्यवहार हाताळणाऱ्या भांडवली बाजार आणि क्लियरिंग हाऊस यांचा डब्ल्यूईएफ हा महासंघ आहे. २०० हून अधिक बाजार मंच महासंघाचे सभासद आहेत. लिमये यांनी या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना, पारदर्शी, स्थिर आणि कार्यक्षम भांडवली बाजाराच्या विकासासाठी प्रयत्नरत आणि जगभरातील धोरणकर्ते, नियामक आणि सरकारी संस्थांसह कार्य करणाऱ्या एका जागतिक संस्थेवर नेतृत्वदायी भूमिका बजावण्याची संधी हा मोठा बहुमान असल्याचे सांगितले. डब्ल्यूईएफचे मुख्यालय हे लंडनमध्ये असून, या महासंघाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी सुकुमार यांनी लिमये यांच्या निवडीचे स्वागत प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.