अरविंद मिल्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, डॉनीयर इंडस्ट्रीज, मफतलाल, बॉम्बे डाइंग, ट्रायडंट इंडस्ट्रीज, वेलस्पन ग्रुप, गोकलदास एक्स्पोर्ट आणि इंडो काऊंट या वस्त्रोद्योगातील अग्रेसर उत्पादकांसह एकूण २६० बडय़ा विक्रेते आणि सुमारे ६००० छोटे-मोठे विक्रेते, होलसेलर्स, व्यापारी व व्यावसायिक खरेदीदारांचा एका अनोख्या ऑनलाइन बाजारमंचाने दुवा जोडला आहे. ‘एक्सस्टॉक डॉट कॉम’ नावाच्या बाजारमंचातून बडय़ा कापड गिरण्यांकडील त्यांच्या देशविदेशातील नोंद मागण्या पूर्ण केल्यानंतर उरलेल्या आणि अतिरिक्त साठय़ाचे झटपट आणि मध्यस्थ व दलालाविना पारदर्शकरीत्या निवारण केले जाते.
बऱ्याचदा बडय़ा कापड गिरण्यांना मागणीबाहय़ अतिरिक्त साठय़ाला अपेक्षित किंमत मिळत नाही, शिवाय खरेदीदार शोधण्यासाठी दलालीचा खूप मोठा खर्चही उचलावा लागतो. त्याउलट छोटय़ा खरेदीदारांना नामांकित नाममुद्रांची उत्पादने अत्यंत पारदर्शी पद्धतीने विनासायास मिळविण्यासाठी ‘एक्सस्टॉक’ हे उपयुक्त व्यासपीठ ठरत असल्याचे आढळून आले आहे.
‘एक्सस्टॉक’ हे ऑनलाइन व मोबाइल मंचावर उपलब्ध झालेले व्यापार ते व्यापार (बी २ बी) धाटणीचे व्यासपीठ पहिल्या पिढीचे उद्योजक संजीव खंडेलवाल आणि मिहिर शाह यांनी सुरू केले आहे. सूत, धागे, कापड, तयार कपडे ते घरगुती वापराचे पडदे, चादरी, टॉवेल्स आदींच्या अतिरिक्त साठय़ाचे एक्सस्टॉकवर ऑनलाइन लिलाव करून खरेदीदारांना इच्छित किमतीला आवश्यक तेवढा माल मिळविता येतो. आठ महिन्यांपूर्वीच्या प्रारंभापासून एक्सस्टॉकने असे सुमारे ३५० लिलाव आजवर पूर्ण केले आहेत.

भारतातील निर्यातप्रधान वस्त्रोद्योगातून दरसाल सुमारे ४०,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त साठा उत्पादित होत असतो. या मालाला एक सुरचित बाजारपेठ मिळवून देण्याचा आणि पारंपरिक व्यापार ते व्यापार व्यवहारांचा तोंडवळा बदलण्याचा हा एक प्रयत्न आहे. विक्रेते व खरेदीदार व्यापारी दोहोंसाठी या बाजारमंचाचे फायदे निश्चितच आहेत. म्हणूनच येत्या वर्षभरात या बाजारपेठेपैकी १० टक्के हिस्सा म्हणजे साधारण ४००० कोटींची उलाढाल ‘एक्सस्टॉक’मार्फत होईल, असा विश्वास आहे.