राणा कपूर यांना मुख्याधिकारीपदी मुदतवाढीचा ठराव

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेकडून मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राहण्याला पाच महिने मिळालेल्या परवानगीलाच येस बँकेचे राणा कपूर यांनी आव्हान दिले आहे. नवा उत्तराधिकारी शोधण्यास वेळ मिळावा असे कारण देत कपूर हे किमान एप्रिल २०१९ पर्यंत बँकेच्या प्रमुखपदी कायम राहतील, असा ठरावच बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवारी मंजूर केला.

चालू वित्त वर्षांचा ताळेबंद तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या कामाचा ताण आल्याने, राणा कपूर यांचा वारसदार म्हणून पात्र उमेदवार शोधण्यास वेळ लागेल, अशी सबब येस बँकेच्या संचालक मंडळाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर संभाव्य वारस म्हणून बँकेच्या दोन विद्यमान अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णयही मंगळवारी घेण्यात आला.

देशातील खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने थकीत कर्जाबाबत अनियमितता केल्याचा ठपका ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेने मात्र राणा कपूर यांना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ३१ जानेवारी २०१९ पर्यंतच राहण्याची मुभा देत नव्या उत्तराधिकारी निवडीचे आदेश नुकतेच दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी मुंबईतील बँक मुख्यालयात झाली. या बैठकीत प्रत्यक्षात मध्यवर्ती बँकेच्या फर्मानाला डावलून कपूर यांनाच मुदतवाढ मिळावी अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

बंधू अशोक कपूर यांच्या निधनानंतर २००४ पासून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या राणा कपूर यांची ऑगस्ट २०१८ मध्ये कारकीर्द संपल्यानंतर ती आणखी तीन वर्षे म्हणजे ऑगस्ट २०२१ पर्यंत विस्तारण्याच्या प्रस्तावाला बँकेच्या भागधारकांनी नुकतीच मंजुरी दिली होती.

मंगळवारच्या बैठकीत नव्या मुख्याधिकाऱ्यासाठी शोध व निवड समिती स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर बँकेतील रजत मोंगा व प्रलय मोंडल यांना कार्यकारी संचालक म्हणून बढती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही प्रस्तावांवर रिझव्‍‌र्ह बँकेची मंजुरी मिळविली जाणार आहे.

त्याचबरोबर राणा कपूर यांना ३० एप्रिल २०१९ पर्यंत मुख्याधिकारीपदी कायम ठेवणे सद्य:स्थितीत आवश्यक असल्याचे बँकेच्या संचालक मंडळाने नमूद केले आहे. दरम्यान, बँकेच्या भांडवली बाजारातील समभाग व्यवहाराचा सेबी ही नियामक यंत्रणा आढावा घेणार असल्याचे कळते.

यापूर्वी अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांच्या मुदतवाढीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर शर्मा यांनी डिसेंबर २०१८ अखेर बाजूला होण्याची भूमिका जाहीर केली. या दोन्ही बँकांमधील अनुत्पादक मालमत्तेतील वाढ सलग दुसऱ्या वर्षीही प्रत्येकी १०,००० कोटी रुपयांहून अधिक राहिली आहे.

‘कर्ज प्रकरणांची  तपासणी करा’

येस बँकेचे सह संस्थापक आणि दिवंगत अशोक कपूर यांच्या पत्नी मधू कपूर यांनी राणा कपूर यांच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, बँकेने मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणांचे न्यायवैद्यक परीक्षण करण्याची मागणी केली आहे. नवीन मुख्याधिकाऱ्याची निवड योग्य पद्धतीने होण्यासाठी राणा कपूर यांना या संपूर्ण प्रकियेदरम्यान रजेवर पाठवावे, अशी सूचनाही मधू कपूर यांनी केली आहे. राणा कपूर आणि कुटुंबीयांचा या खासगी बँकेत १०.६६ टक्के भांडवली हिस्सा आहे. तर मधू कपूर यांचा ८ टक्के हिस्सा आहे.