निराशाजनक अर्थसंकल्पानंतर, गुंतवणूकदारांचे डोळे लागलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्य-तिमाही पतधोरणातून निराशाच पदरी येण्याची शक्यता पाहता, भांडवली बाजाराने चालू महिन्यांत सर्वात मोठी आपटी बुधवारी घेतली. गेल्या काही दिवसात याच आशेवर घोडदौड सुरू असलेल्या  मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक- सेन्सेक्स आज २०२.३७ अंशांनी रोडावून १९,३६२.५५ वर खालावला. सेन्सेक्सने आधीच्या आठवडय़ात सलग सत्रांमध्ये केलेल्या कमाईपैकी ३२०.६८ अंश गेल्या सलग तीन दिवसात  गमावले आहेत.
जागतिक स्तरावर भांडवली बाजारातील नरमाईचे वातावरण तर देशांतर्गत आर्थिक विकासाबाबत चिंता निर्माण व्हावी अशी अनिश्चितता याबाबीही शेअर बाजारातील मोठय़ा घसरणीला कारणीभूत ठरल्या. व्याजदराबाबत संवेदनशील बँका, स्थावर मालमत्ता, वाहन उद्योगातील कंपन्यांच्या समभागांबरोबरीनेच, आयटी, सार्वजनिक उपक्रम आणि रिफायनरी उद्योगातील कंपन्यांच्या समभागांचे भावही तीव्र स्वरूपात ओसरले. परिणामी प्रमुख निर्देशांकांमध्ये जवळपास एक टक्क्यांची मोठी घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकाने ५९०० च्या महत्त्वाच्या पातळीपुढील सरशी बुधवारी गमावली. कालच्या तुलनेत ६२.९० अंशांच्या घसरणीने निफ्टी दिवसअखेर ५८५१.२० अंशांवर स्थिरावला. बँकिंग निर्देशांकाला बुधवारी सर्वाधिक २.१८ टक्क्यांचा फटका बसलेला दिसून आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: 200 point speed breaker in the way of sensex
First published on: 14-03-2013 at 03:37 IST