सहकार क्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असलेली अभ्युदय सहकारी बँक २०१४-१५ हे आपल्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत असून, ठेवीदार, भागधारक आणि ग्राहकांसाठी यानिमित्ताने बँकेने विविध उपक्रमांची आखणी केली आहे. विशेषत: लघु व मध्यम उद्योजकांमध्ये बँकेचा पाया विस्तारेल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून, या वर्गासाठी औद्योगिक प्रदर्शनाच्या आयोजनाची बँकेने योजना आखली आहे.
अभ्युदय बँकेचा सुवर्ण जयंती उत्सव उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी १६ जानेवारीला सेंट्रल रेल्वे मैदान, परळ येथे सायं. ५ वाजता योजण्यात आला आहे. राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या समारंभात, बँकेने ग्राहक व सभासदांसाठी योजलेल्या विशेष योजनांची घोषणाही अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आमदार सीताराम घनदाट करणार आहेत.
डिसेंबर २०१३ अखेर अभ्युदय बँकेने १४,२५२ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला असून, यात कर्जे ५४४७ कोटी रुपये तर ठेवींचा वाटा ८८०५ कोटी रुपये असा आहे. बँकेने २०२० सालापर्यंत ५० हजार कोटी रुपयांच्या एकूण व्यवसायाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे अभ्युदय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विजय मोर्ये यांनी सांगितले.
सध्याच्या मलूल आर्थिक वातावरणात सावधगिरी म्हणून बँकेने मोठय़ा रकमेच्या कर्जवितरणात हात आखडता घेतला असून, परिणामी बँकेच्या कर्ज/ठेव गुणोत्तरात उतार आल्याचे दिसून येत आहे. परंतु उत्तरोत्तर हे गुणोत्तर ६५ ते ६८ टक्के अशा समाधानकारक स्तरावर आणले जाईल, असे प्रयत्न सुरू असल्याचे मोर्ये यांनी स्पष्ट केले. मार्च २०१३ अखेर बँकेने भांडवल पर्याप्ततेचे १३.२२% असे सरस प्रमाण राखले असून, ९१.२२ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.
अभ्युदय बँकेच्या सध्या ११० शाखा असून, लवकरच पेण-रायगड येथे १११वी शाखा सुरू होत आहे, चालू वर्षांत नवीन २९ शाखांचे बँकेचे लक्ष्य आहे.