या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्युचुअल फंडांचे प्रकार- एक दृष्टिक्षेप
या गुंतवणूकदार जागरूकता मालिकेत आम्ही ‘असेट अॅलोकेशन’चे महत्त्व सांगितले, म्युचुअल फंडांभोवतीच्या काही दंतकथांची फोड केली आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत केली. या मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या लेखात आम्ही निरनिराळ्या प्रकारच्या म्युचुअल फंडांची वैशिष्टय़े सांगू.
परिपक्वता कालावधीवर (मॅच्युरिटी पिरिअड) आधारित असलेले म्युचुअल फंडांचे तीन वेगवेगळे प्रकार समजून घेऊया.
१. ओपन एंडेड फंड – हा म्युचुअल फंड कायमस्वरूपी ‘सबस्क्रिप्शन’ साठी उपलब्ध असतो आणि तो केव्हाही ‘रिडीम’ करता येतो.
२. क्लोज्ड एंडेड फंड – या प्रकारच्या म्युचुअल फंडाचा निश्चित परिपक्वता कालावधी असतो. उदाहरणार्थ, 3-6 वर्षे. हे फंड बाजारात येण्याच्या वेळी एका विशिष्ट कालावधीसाठी सबस्क्रिप्शनकरता खुले असतात.
३. इंटरव्हल फंड्स – या प्रकारच्या म्युचुअल फंडांत ओपन एंडेड व क्लोज्ड एंडेड फंड्सच्या वैशिष्टय़ांची सरमिसळ असते. या फंडांचे शेअर बाजारात सौदे होऊ शकतात आणि पूर्वनिर्धारित कालखंडांमध्ये ते विक्री किंवा रिडिम्प्शनसाठी खुले असतात.
आता आपण गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर आधारित असलेले म्युचुअल फंडांचे प्रकार बघूया.
१. इक्विटी फंड्स – हे म्युचुअल फंड्स त्यांच्या निधीचा (कॉर्पस) मोठा भाग शेअर बाजारात गुंतवतात आणि त्यांच्या गुंतवणुकीचा उद्देश दीर्घकालीन भांडवलवृद्धीचा असतो. हे फंड्स अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करू शकतात. दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगणाऱया गुंतवणूकदारांसाठी हे सोयिस्कर असतात.
२. डेट व मनी मार्केट फंड्स – डेट म्युचुअल फंड्स साधारणत: बाँड्स, कंपन्यांचे डिबेंचर्स, सरकारी रोखे यासारख्या तारणपत्रांमध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी फंड्सपेक्षा कमी तरल असण्याची शक्यता असलेले हे म्युअल फंड्स नियमित उत्पन्न देतात.
३. बॅलन्स्ड फंड्स – या प्रकारचे म्युचुअल फंड्स योजनेच्या पूर्वनिर्धारित गुंतवणूक उद्दिष्टांनुसार इक्विटीज आणि निश्चित उत्पन्न देणाऱया असा दोन्ही प्रकारच्या इक्विटीजमध्ये गुंतवणूक करतात. उत्पन्न आणि माफक वाढ यांची सांगड घालू पाहणाऱया गुंतवणूकदारांसाठी हे म्युचुअल फंड्स आदर्श ठरू शकतात.
४. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) – प्राप्तीकर कायदा 1961 मधील विशिष्ट तरतुदींच्या अंतर्गत करबचत योजना गुंतवणूकदारांना करविषयक सवलत देऊ करतात. या विकासोन्मुख योजना असतात आणि प्रामुख्याने शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या फंडांना प्राप्तीकर कायद्यात नमूद केल्यानुसार 3 वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो.
५. थिमॅटिक फंड्स – एका विशिष्ट संकल्पनेशी जवळून संबंधित असलेल्या (उदा.- पायाभूत सोयी) क्षेत्रसमूहामध्ये गुंतवणूक करणाऱया इक्विटी योजना म्हणजे थिमॅटिक फंड्स होत. या म्युचुअल फंडांचे काम करण्याचे क्षेत्र व्यापक असते.
या गुंतवणूकदार जागरूकता मालिकेत आम्ही म्युचुअल फंडांशी संबंधित तुमच्या काही शंकांची उत्तरे दिली आहेत, अशी आशा करतो. आता तुम्ही म्युचुअल फंडांमध्ये आत्मविश्वासाने गुंतवणूक कराल, अशीही आम्हाला आशा आहे.

Web Title: Article on mutual fund investment part one
First published on: 15-12-2015 at 18:27 IST