मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी सलग ११ व्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर ४ टक्क्यांच्या अल्पतम पातळीवर कायम ठेवला असला तरी, जगभरातील भू-राजकीय अनिश्चितता आणि किंमतवाढीचा भडका पाहता आगामी काळात रोख महागाई नियंत्रणाकडे राहील, असे स्पष्ट केले आहे. त्याचे पडसाद बँकिंग वर्तुळात उमटू लागले असून, बँक ऑफ बडोदाने सोमवारी तिच्या कर्जाचे व्याजदर ०.०५ टक्क्यांनी वाढवत असल्याचे स्पष्ट केले. मंगळवार, १२ एप्रिलपासून लागू होणाऱ्या दरवाढीमुळे, बँक ऑफ बडोदाच्या एक वर्ष मुदतीच्या ‘एमसीएलआर’वर आधारित व्याजदर ७.३५ टक्क्यांवर गेला आहे. याचप्रमाणे एक महिना, तीन महिने, सहा महिने मुदतीच्या कर्ज व्याजदरातही ०.०५ टक्के वाढ बँकेने केली आहे. परिणामी बँकेकडून वितरित वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि गृह कजार्च्या व्याजदरात आनुषंगिक वाढ होणार आहे.