नवी दिल्ली : ‘भारतपे’चे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर  ग्रोव्हर यांच्याकडील समभाग परत मिळवण्यासाठी त्या संबंधाने कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे भारतपे मंगळवारी सांगितले. भागधारकांच्या करारानुसार अशनीर यांच्याकडील प्रतिबंधित समभाग परत मिळविण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलली जातील असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

भारतपेने मार्च महिन्यात अशनीर यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल कारवाई म्हणून कंपनीच्या सर्व पदांवरून त्यांची उचलबांगडी करताना, त्यांचा ‘सह-संस्थापक’ हा दर्जा हिरावून घेतला होता. सल्लागार कंपनी पीडब्ल्यूसीने केलेल्या तपासाअंती सादर केलेल्या अहवालाच्या आधारे, अशनीर  आणि  माधुरी जैन ग्रोव्हर यांच्या काळात कंपनीमध्ये बनावट पावत्या तयार करणे आणि वैयक्तिक कारणासाठी अवाजवी खर्च केल्याचे आरोप करत, कंपनीने त्यांच्यावर कथित आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला होता. भारतपेने केलेल्या चौकशीदरम्यान बनावट पावत्या देणाऱ्या विक्रेत्यांचीही ओळख पटली आहे. विक्रेत्यांना रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली आहे. विक्रेत्यांशी निहित हितसंबंध असणाऱ्या ५६ कर्मचाऱ्यांची कंपनीने हकालपट्टी केली आहे. कंपनीने यावर उपाय म्हणून कर्मचाऱ्यांसाठी नवीन आचारसंहिता लागू केली आहे.